
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून मुंबईतील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर शनिवारी दुपारी मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे आपल्या वकिलांच्या टीमसह आमदार आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कायदेशीर नोटीस देण्यासाठी सतीश सालियान मातोश्रीवर पोहोचले होते.
मातोश्रीवर जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सतीश सालियान आक्रमक पवित्र्यात दिसून आले. ‘मला कोणीही नियंत्रित करू शकत नाही. फक्त देव मला नियंत्रित करू शकतो, दुसरे कोणीही नाही,’ असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मातोश्रीबाहेर पोहोचल्यानंतरही त्यांनी आपल्यासोबत वकिलांची पूर्ण टीम असल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणात वेळ घेतल्यामुळे सहा वर्षे गेली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत आपण समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले.
सतीश सालियान आणि त्यांच्या वकिलांची टीम मातोश्रीवर येणार असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाकडूनही हालचाली सुरू झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे मातोश्रीवर दाखल झाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी अनिल परब यांनी वकिलांची व्यवस्था केली होती. अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव हे नोटीस स्वीकारण्यासाठी मातोश्रीच्या मुख्य गेटवर उपस्थित होते.
या घडामोडींमुळे मातोश्रीबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मातोश्रीचे गेट बंद ठेवत परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसैनिकही मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमा झाले होते. सतीश सालियान यांना आत प्रवेश देऊ नये, अशी भूमिका काही शिवसैनिकांनी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे मातोश्रीच्या प्रवेशद्वाराबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, सतीश सालियान यांच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांना बजावलेली ५०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची कायदेशीर नोटीस अखेर ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली. नोटीस स्वीकारल्यानंतर त्याची पावती सतीश सालियान यांच्या वकिलांना देण्यात आली. या संपूर्ण घडामोडीमुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी काळात या कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule