
बीड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रांतर्गत तरनळी येथील तांदळे वस्तीवरील षटकोनी आकाराची शाळेची इमारत १८ सप्टेंबरच्या रात्री कोसळून जमीनदोस्त झाली. सुदैवाने ही घटना शाळा बंद असताना रात्री घडल्याने मोठी दुर्घटना टळली. याच इमारतीत सुमारे १८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१८ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या हलक्या पावसानंतर शाळेच्या इमारतीचे छत आणि बांधकाम अचानक कोसळले. शाळा मध्यरात्री बंद असल्याने त्यावेळी विद्यार्थी किंवा शिक्षक इमारतीत उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या इमारतीची अवस्था यापूर्वीपासूनच धोकादायक होती. अगदी हलक्या पावसातही शाळेच्या छतातून पाणी ठिबकत असल्याने इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याची माहिती शिक्षण विभागासह पंचायत समिती आणि महसूल विभागाला देण्यात आली होती, अशी माहिती तांदळे वस्तीचे रहिवासी चांगदेव सानप यांनी दिली.
या इमारतीत सुमारे १८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने पालकांच्या सुरक्षेच्या चिंतेत भर पडली आहे. इमारत कोसळण्यापूर्वीच तिची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.
घटनेनंतर पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत असताना वेळीच उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी आणि शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis