
रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने आज भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद, भाट्ये ग्रामपंचायत, फिनोलेक्स, एम. एम. बी.च्या सहकार्याने भाट्ये समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी निवास उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.
प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून, प्लास्टिक प्रदूषण संपवून पर्यावरणाला हातभार लावा, असे आवाहन करून श्री. सूर्यवंशी यावेळी म्हणाले, समुद्र, नदी, जलस्त्रोत या ठिकाणी आज विशेषत: प्लास्टिक प्रदूषण होत आहे. त्याची स्वच्छता करणे, हे प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून 'एकल प्लास्टिक वापरू नका, एकच ध्यास ठेवू या प्लास्टिक पिशवी हटवू या, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या. वापर टाळू या प्लास्टिकचा जागर करू या' असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी