महानगरपालिकेच्या आंदोलनकर्त्या कर्मचा-यांद्वारे परभणीत जोरदार रास्तारोको आंदोलन
परभणी, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। आपल्या विविध मागण्यांकरीता 10 ऑगस्ट पासून महानगरपालिका कार्यालयासमोर अधिकार्यासह कर्मचार्यांनी सुरु केलेल्या आंदोलना दरम्यान म्हणजे 24 व्या दिवशी जोरदार रास्तारोको केला. या आंदोलनकर्त्यांनी बुधवारी सकाळी महानगरपालि
महानगरपालिकेच्या आंदोलनकर्त्या कर्मचार्यांद्वारे परभणीत जोरदार रास्तारोको आंदोलन : 24 दिवसांपासून आंदोलन सुरुच


परभणी, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। आपल्या विविध मागण्यांकरीता 10 ऑगस्ट पासून महानगरपालिका कार्यालयासमोर अधिकार्यासह कर्मचार्यांनी सुरु केलेल्या आंदोलना दरम्यान म्हणजे 24 व्या दिवशी जोरदार रास्तारोको केला.

या आंदोलनकर्त्यांनी बुधवारी सकाळी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. त्या पाठोपाठ महापालिका प्रशासनासह सरकारही आपल्या मागण्यांकडे कानाडोळा करीत आहेत, असे नमूद करीत आंदोलनाच्या आज 24व्या दिवशी पालिका कार्यालयासमोरील महामार्गापर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत जावून रास्तारोको सुरु केला. त्यामुळे या रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. महानगरपालिकेंतर्गत अधिकारी-कर्मचार्यांचे वेतन तसेच सेवानिवृत्ती वेतन हे चार-पाच महिन्यांपासून प्रलंबित आहेत. महापालिकेत वेतनासाठी सहाय्यक अनुदान कमी येत असल्यामुळे वेतन अदा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. महापालिकेस वाढीव अनुदान द्यावे, या करीता शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावास मंजूरी मिळावी म्हणून पाठपुरावाही करण्यात आला. परंतु, सरकारद्वारे वाढीव जीएसटी अनुदान मंजूर करुनसुध्दा फरकाची थकबाकी रक्कम आतापर्यंत अदा करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचार्यांचे वेतन प्रलंबित राहिले असून शेकडो कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी खंत नगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने व्यक्त केली. प्रत्येक कर्मचार्यांच्या कुटूंबियांसमोर वयोवृध्द आई-वडीलांच्या उपचारासह मुलांच्या शिक्षणाचा तसेच दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहीला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे महानगरपालिकेंतर्गत दैनंदिन कामकाज पूर्णतः कोलमडले आहे. संपूर्ण महानगरात मध्यवस्तीसह चोहोबाजूंनी स्वच्छतेसह अन्य मुलभूत सोयी सुविधांचे तीन-तेरा वाजले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande