
धाराशिव, २ सप्टेंबर (हिं.स.) : शेतीसोबत कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मधुमक्षिकापालन यांसारख्या पूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. यासाठी शाश्वत व सर्वसमावेशक कृषी पद्धतींचा स्वीकार करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांची माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सकारात्मक आणि विकासाभिमुख पत्रकारितेतून अशा यशकथा समाजासमोर आल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. त्यामुळे धाराशिवसारख्या आकांक्षित जिल्ह्यांच्या विकास प्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय (PIB), मुंबई यांच्या वतीने धाराशिव येथे पत्रकारांसाठी आयोजित ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत ते बोलत होते. ‘आकांक्षित जिल्ह्यांसाठी शाश्वत शेतीचे सुलभीकरण’ या प्रमुख संकल्पनेवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, PIBचे माहिती व संचार अधिकारी हर्षल आकुडे, माहिती सहायक एडगर कोएल्हो आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शेतीला पूरक व्यवसायांची जोड आवश्यक
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी पुजार यांनी ‘वार्तालाप’ कार्यशाळेच्या आयोजनाचे कौतुक केले. स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत व सर्वसमावेशक कृषी पद्धती अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीसोबत कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मधुमक्षिकापालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त माहिती माध्यमांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. सकारात्मक आणि विकासाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून शेतीतील यशकथा समाजापर्यंत पोहोचल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis