
परभणी, 22 सप्टेंबर (हिं.स.)। एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर संबंधिताने बोरी पोलिसांची भेट घेऊन माहिती दिली असता बंधपत्राच्या पुढील कार्यवाहीसाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस हवालदाराने केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी पोलीस हवालदारास रंगेहात ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार, तक्रारदारावर शेतजमिनीच्या वादातून बोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात परभणी जिल्हा न्यायालयाने तक्रारदारास अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर तक्रारदाराने बोरी पोलिसांतील तपासीक अंमलदार नेमणूक बोरी पोलिस ठाणे ता. जिंतूर रा. सरफराजनगर परभणी यांची भेट घेतली असता त्यांनी बंधपत्राच्या पुढील कार्यवाहीसाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले.
प्रतिबंधक विभागाने तक्रारच्या पडताळणीत बोरी पोलीस ठाण्यात पंचासमक्ष आरोपी पोलिस अंमलदार याने दहा हजार रुपयांचा आकडा मोबाईलवर टाईप करून तक्रारदारास दाखवत लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर परभणीतील बी. रघुनाथ सभागृह परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईत आरोपी पोलीस हवालदार याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच प्रतिबंधक विभागाच्या पथकान रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी पोलीस हवालदार यास ताब्यात घेण्यात आले असून नवा मोंढा पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम - १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक किशोर तरोणे यांच्या पर्यवेक्षणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर अनिलपत्रेवार, पोलीस हवालदार नामदेव आदमे, अंमलदार नागरगोजे, घुले यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis