
लातूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। अहमदपूर शहरातून जाणाऱ्या NH-548D महामार्गासाठी स्वतंत्र बायपास मंजूर करून शहरातील वाहतुकीचा वाढता ताण कमी करावा, अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी नवी दिल्ली येथे निवेदन सादर केले.
अहमदपूर हे महत्त्वाचे शहरी व व्यापारी केंद्र असून शहरातून NH-361 आणि NH-548D हे दोन्ही महामार्ग जात असल्याने दिवसेंदिवस वाहतुकीची वर्दळ वाढत आहे. त्यातच अवजड व व्यावसायिक वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी, स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वाहतुकीतील संघर्ष यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होत आहे. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनेही स्वतंत्र बायपासची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी निवेदनात नमूद केले.
बायपाससाठी सर्वेक्षणापासून भूसंपादनापर्यंतची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
NH-548D अहमदपूर बायपाससाठी सविस्तर वाहतूक सर्वेक्षण व व्यवहार्यता अभ्यास करण्यात यावा, तांत्रिकदृष्ट्या योग्य मार्गाची प्राथमिक पाहणी करून अलाइनमेंट निश्चित करावी तसेच प्रस्तावित बायपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आवश्यक मंजुरीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून बायपासचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. शहरातून जाणारी अवजड व महामार्गावरील वाहतूक शहराबाहेर वळविल्यास अहमदपूरमधील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळेल. तसेच भविष्यातील शहराच्या नियोजित विकासासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे ना. बाबासाहेब पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis