नाशिक - गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाच्या डिजिटल जतनासाठी आता उरले फक्त तीन दिवस
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचे आवाहन नाशिक, 22 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाशी निगडित कुटुंबाच्या तसेच परिसराच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, आठवणी आणि सांस्कृतिक ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘Bappa.org’ या उपक्र
नाशिक - गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाच्या डिजिटल जतनासाठी आता उरले फक्त तीन दिवस


जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचे आवाहन

नाशिक, 22 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाशी निगडित कुटुंबाच्या तसेच परिसराच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, आठवणी आणि सांस्कृतिक ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘Bappa.org’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ, आरती, कथा, पारंपरिक पाककृती, सजावट तसेच विविध सांस्कृतिक परंपरांची नोंद संकेतस्थळावर करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. घरगुती गणपतीची आरास, पारंपरिक पूजा-विधी, आरती, नैवेद्य, स्थानिक खाद्यपदार्थ, गणेशमूर्ती निर्मिती, सजावट, भजन-कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कौटुंबिक प्रथा यामधून प्रत्येक भागाची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख अधोरेखित होते. काळानुरूप बदलत जाणाऱ्या या परंपरांची डिजिटल माध्यमातून नोंद करून त्या पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणे, हा ‘Bappa.org’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

नाशिक जिल्ह्याला प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात गणेशोत्सव साजरा करण्याच्या विविध पद्धती आजही प्रचलित आहेत. काही ठिकाणी पारंपरिक आरास व स्थानिक कलाकुसरीला प्राधान्य दिले जाते, तर काही कुटुंबांमध्ये विशिष्ट पूजा-विधी, नैवेद्य किंवा आरतीची परंपरा जपली जाते. अशा स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि सांस्कृतिक आठवणींची नोंद ‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande