सुरुवातीच्या तेजीनंतर शेअर बाजार घसरणीसह बंद
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी सुरुवातीला तेजीची नोंद करणाऱ्या देशांतर्गत शेअर बाजाराला अखेर घसरणीचा सामना करावा लागला. परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली जोरदार विक्री, वरच्या पातळीवर झालेली नफावसुली आणि मा
Stock Market Closing


नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी सुरुवातीला तेजीची नोंद करणाऱ्या देशांतर्गत शेअर बाजाराला अखेर घसरणीचा सामना करावा लागला. परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली जोरदार विक्री, वरच्या पातळीवर झालेली नफावसुली आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेली मोठी घसरण यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरण बदलले. त्यातच इंडिया व्हीआयएक्समध्ये झालेली वाढही बाजारासाठी नकारात्मक ठरली. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२९.९१ अंक म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी घसरून ७४,५२९.०८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८५.३० अंक म्हणजेच ०.३६ टक्क्यांनी घसरून २३,३२९ अंकांवर स्थिरावला.

सेन्सेक्सची सुरुवात ४२.५१ अंकांच्या वाढीसह ७४,९०१.५० अंकांवर झाली. सुरुवातीच्या व्यवहारात काही काळ चढ-उतार राहिल्यानंतर खरेदीचा जोर वाढला आणि सेन्सेक्स १७९.९४ अंकांनी वाढून ७५,०३८.९३ अंकांच्या दिवसातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांक लाल निशाणात गेला. दुपारी दोनच्या सुमारास सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकी पातळीवरून ६१५.२२ अंकांनी घसरून ७४,४२३.७१ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर झालेल्या काही प्रमाणातील खरेदीमुळे निर्देशांकाने नीचांकी पातळीवरून १०५.३७ अंकांची सुधारणा केली.

निफ्टीची सुरुवात ३९.७५ अंकांच्या वाढीसह २३,४५४.०५ अंकांवर झाली. सुरुवातीच्या चढ-उतारानंतर खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टी ७४.७० अंकांनी वाढून २३,४८९ अंकांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढत गेला आणि निफ्टी दिवसाच्या उच्चांकी पातळीवरून २०३.२५ अंकांनी घसरून २३,२८५.७५ अंकांपर्यंत आला. अखेर खरेदीमुळे काहीशी सुधारणा होत निफ्टी २३,३२९ अंकांवर बंद झाला.

आज माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांवर दिवसभर दबाव राहिला. त्यामुळे निफ्टी माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक ०.८६ टक्क्यांनी, तर बीएसई तंत्रज्ञान निर्देशांक ०.६८ टक्क्यांनी घसरला. याशिवाय बँकिंग, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू, एफएमसीजी, आरोग्यसेवा, धातू आणि तेल-गॅस क्षेत्रांचे निर्देशांकही लाल निशाणात बंद झाले. दुसरीकडे माध्यम क्षेत्राच्या समभागांमध्ये खरेदीचा जोर राहिल्याने माध्यम निर्देशांक एक टक्क्यांनी वाढला. स्थावर मालमत्ता निर्देशांकातही ०.७० टक्क्यांची वाढ झाली.

बाजारातील घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४८२.६८ लाख कोटी रुपयांवरून घटून ४८०.३१ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.३७ लाख कोटी रुपयांची घट झाली.

दिवसभराच्या व्यवहारात बीएसईवर ४,५८१ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,१७४ समभाग वधारले, तर २,१८९ समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी सात समभाग वाढीसह, तर २३ समभाग घसरणीसह बंद झाले. कोल इंडिया, एटरनल, इंटरग्लोब एव्हिएशन, टायटन कंपनी आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे प्रमुख वाढणारे समभाग ठरले. तर टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि सन फार्मास्युटिकल्स यांच्यात घसरण नोंदवली गेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande