इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यावर अमेरिकेचे निर्बंध
वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर (हिं.स.)। संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) बैठकीदरम्यान इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यूएनजीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये
इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यावर अमेरिकेचे निर्बंध


वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर (हिं.स.)। संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) बैठकीदरम्यान इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यूएनजीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. मात्र, दुसरीकडे अमेरिकेने त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर कडक निर्बंध लागू केले आहेत.

अहवालानुसार, गेल्या सात महिन्यांपासून अमेरिका आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांना न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असताना कठोर निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. त्यांना मॅनहॅटनमधील त्यांच्या हॉटेलपासून संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयापर्यंतच जाण्याची मुभा असेल. याशिवाय न्यूयॉर्कमधील इतर कोणत्याही ठिकाणी त्यांना स्वतंत्रपणे फिरता येणार नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने लागू केलेल्या नियमांनुसार, त्यांना इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल.

इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे तज्ज्ञ रिचर्ड गोवन यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान आपल्या भाषणातून आंतरराष्ट्रीय समुदायासमोर इराणची भूमिका मांडतील. इराण हा अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमकतेचा बळी ठरला असून, इराणने उचललेली सर्व पावले ही आत्मसंरक्षणासाठी होती, असा दावा ते करू शकतात. यासोबतच इराणचे प्रतिनिधीमंडळ न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन आणि युरोपीय थिंक-टँकच्या विश्लेषकांशीही भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही विश्लेषकांनी इराणच्या प्रतिनिधीमंडळाशी चर्चा करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कारण अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेहरानसोबतच्या काही प्रकारच्या चर्चांवर मर्यादा आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर वर्षभराने होत आहे. गेल्या वर्षी इराणच्या अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य करून अमेरिका आणि इस्रायलने १२ दिवस हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर काही महिन्यांनी पेजेश्कियान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले होते.यंदाचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा इराणच्या अणुकार्यक्रमावरून तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक रोखण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाईचे समर्थन करत इराणवर गंभीर आरोप केले आहेत. इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, ट्रम्प यांनी पेजेश्कियान यांची भेट घेण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मते, या जागतिक परिषदेदरम्यान कोणताही मोठा राजनैतिक करार होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. दोन्ही देशांदरम्यान गंभीर चर्चा झाल्यास ती भविष्यातच होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande