
- MEDAकडून १६ वा राज्यस्तरीय पुरस्कार- ५७६ किलोवॅट सौर प्रकल्पामुळे ५५ टक्के वीज गरज भागविली
अमरावती, 25 सप्टेंबर (हिं.स.)।
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA)तर्फे विद्यापीठाला १६ वा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. MEDA अमरावती विभागाचे महाव्यवस्थापक अभिजित हिंगे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.विद्यापीठ परिसरात ५७६ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, विद्यापीठाच्या एकूण वीज मागणीपैकी सुमारे ५५ टक्के वीज सौर प्रकल्पातून उपलब्ध होत आहे. ऊर्जा बचतीसाठी ६५ टक्के पारंपरिक विद्युत उपकरणांचे स्टार लेबल व एनर्जी सेव्हर उपकरणांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसेच ९० टक्के स्ट्रीट लाईट एलईडी करण्यात आले असून, ५० टक्के सिलिंग फॅन बीएलडीसी फॅनमध्ये बदलण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे दरवर्षी सुमारे ६०० टन कार्बन उत्सर्जन नियंत्रित होत असल्याचे विद्यापीठाने नमूद केले.भूजल पुनर्भरणासाठी दोन मोठे जलाशय, सहा शेततळी आणि २० इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात २.७५ लाख झाडे लावण्यात आली असून जैविक कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी कंपोस्ट खड्डेही तयार करण्यात आले आहेत. पुरस्कार स्वीकारताना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्यासह अभियांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी