डफरीन दुर्घटनेच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांकडूनही आश्वासनच
अमरावती, २५ सप्टेंबर (हिं.स.) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३१ ऑगस्ट रोजी डफरीन दुर्घटनेचा अहवाल १ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत सार्वजनिक करण्याची घोषणा केली होती. मात्र, घटनेला महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्या
पालकमंत्र्यांनंतर मुख्यमंत्रीही म्हणाले, डफरीनचा अहवाल लवकर जाहीर करु


अमरावती, २५ सप्टेंबर (हिं.स.) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३१ ऑगस्ट रोजी डफरीन दुर्घटनेचा अहवाल १ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत सार्वजनिक करण्याची घोषणा केली होती. मात्र, घटनेला महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असे सांगितले.

विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी डफरीन दुर्घटनेच्या अहवालाबाबत भूमिका स्पष्ट केली. अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर दुर्घटनेनंतर राजकारण करणाऱ्यांना वस्तुस्थिती समोर येईल, असे त्यांनी म्हटले. मागील काळात नेमके काय घडले, याची माहिती अहवालातून समोर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पालकमंत्र्यांनी अहवाल सार्वजनिक करण्यासाठी १ सप्टेंबरची निश्चित मुदत जाहीर केली होती. मात्र, ती मुदत उलटून गेल्यानंतरही अहवाल प्रसिद्ध झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनीही अहवाल ‘लवकरच’ सार्वजनिक केला जाईल, असे सांगितले असले तरी तो नेमका कोणत्या दिवशी किंवा किती कालावधीत सार्वजनिक होणार, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही.

त्यामुळे डफरीन दुर्घटनेचा अहवाल सार्वजनिक होण्याची प्रतीक्षा कायम असून, अहवालातून दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि जबाबदारीबाबत काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande