
कोल्हापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
अनंत चतुर्दशीची भव्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक संपताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरळीत पार पडली. विसर्जन मार्गावर पडलेल्या चपला, निर्माल्य आणि इतर कचऱ्याचा तातडीने उठाव करत महापालिकेच्या स्वच्छता पथकांनी अवघ्या काही तासांत शहर चकाचक केले आहे.
या विशेष मोहिमेत सुमारे दोन डंपर भरून चपला आणि जवळपास ३० टन कचऱ्याचा यशस्वी उठाव करण्यात आला. प्रामुख्याने ताराबाई रोड, महाद्वार रोड व पापाची तिकटी ते गंगावेश परिसरात सापडलेल्या सर्व चपला तातडीने गोळा करून कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात संकलित करण्यात आल्या असून, त्या पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात येणार आहेत. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा परिसर, राजारामपुरी, शाहूपुरी, कसबा बावडा यांसह सर्व प्रमुख विसर्जन मार्गांची व राजाराम बंधारा घाटाची रात्रीपासूनच कसून स्वच्छता करण्यात आली.
मनपाच्या या मोहिमेत कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, युवान कोल्हापूर, गार्डन क्लब, गोखले कॉलेजचे विद्यार्थी, क्लीन कोल्हापूर क्लब, ग्रीन सृष्टी फाउंडेशन, कोल्हापूर प्रबोधिनी, सायकल वेडे कोल्हापूर आणि गडकोट गिर्यारोहक संस्था यांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि सुमारे ३५० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच मेहनत घेऊन नागरिकांना स्वच्छ परिसर उपलब्ध करून दिला.
उत्सव संपताच आपल्या करवीरनगरीला पुन्हा स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या मनपाचे स्वच्छता कर्मचारी व सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकाऱ्यांचे शहरवासियांनी मनापासून कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar