पैठणी म्हणजे केवळ एक सुंदर साडी नाही; तिच्यात महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा विणलेली आहे – माधुरी दीक्षित
मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। माधुरी दीक्षित आपल्या महाराष्ट्रीयन सौंदर्याची आणि अदाकारीची खास झलक ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सोनी मराठीवरील लोकप्रिय गेम शो ‘कोण होणार करोडपती’चा प्रीमियर 12 ऑ
Madhuri


मुंबई, 26 सप्टेंबर (हिं.स.)। माधुरी दीक्षित आपल्या महाराष्ट्रीयन सौंदर्याची आणि अदाकारीची खास झलक ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सोनी मराठीवरील लोकप्रिय गेम शो ‘कोण होणार करोडपती’चा प्रीमियर 12 ऑक्टोबर 2026 पासून सोनी मराठी आणि Sony LIV वर होणार आहे. सूत्रसंचालक म्हणून आपल्या पहिल्या लूकमध्ये माधुरी दीक्षित सुंदर पैठणी साडीत दिसत असून, या लूकमध्ये पारंपरिक वैभव आणि आधुनिकतेचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.

हा लूक केवळ फॅशनपुरता मर्यादित नसून, माधुरी यांच्या ऑनस्क्रीन प्रवासातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती आणि ज्या परंपरांशी त्यांचं नातं जडलं आहे, त्यांचाही हा सुंदर उत्सव आहे. आपल्या लूकबद्दल बोलताना माधुरी म्हणाल्या, “हा लूक खूप सुंदर आणि खास आहे. पैठणी म्हणजे केवळ एक सुंदर साडी नाही, तर तिच्यात महाराष्ट्राचा शतकानुशतकांचा इतिहास, परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा विणलेला आहे. ही एक अशी परंपरा आहे जी पिढ्यान्‌पिढ्या पुढे आली आहे आणि महाराष्ट्राच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे. पैठणी नेसणं म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरा, कलाकुसर आणि त्याच्या शाश्वत सौंदर्याचा उत्सव साजरा करण्याचा एक सुंदर मार्ग आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “पैठणीच्या विणकामाचं सौंदर्य मला खूप आवडतं आणि प्रत्येक पैठणीची स्वतःची एक खास ओळख असते, ही गोष्टही मला विशेष आवडते. आपल्या संस्कृतीशी जोडलेलं राहून, तिचा आधुनिक पद्धतीने उत्सव साजरा करणं हीदेखील एक सुंदर अनुभूती आहे.”

माधुरी दीक्षित यांच्या सूत्रसंचालनात ‘कोण होणार करोडपती’ ज्ञान, स्वप्नं आणि प्रेरणादायी प्रवासाच्या कहाण्यांनी भरलेला एक नवा अध्याय घेऊन येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये माधुरी यांच्या या नव्या आणि कधीही न पाहिलेल्या अंदाजाची झलक पाहायला मिळते. आव्हानात्मक प्रश्न, मोठी स्वप्नं आणि स्पर्धकांच्या प्रेरणादायी कहाण्यांसोबत हा खेळ प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव घेऊन येणार आहे.

माधुरी दीक्षित यांचा हा कधीही न पाहिलेला अंदाज पाहा ‘कोण होणार करोडपती’मध्ये, 12 ऑक्टोबर 2026 पासून सोनी मराठीवर आणि Sony LIV वर स्ट्रीमिंग.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande