
पुणे, 03 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अटक केली आहे. अटकेनंतर चव्हाण याने संतप्त प्रतिक्रिया देत बापट यांच्याबाबत आक्रमक वक्तव्य केले आहे.“तो टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मी मारणार,” असे संतोष चव्हाण याने म्हटल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील टिळक रोड परिसरात गुरुवारी ही घटना घडली. विद्यानंद बापट हे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलत असताना एका व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला ताब्यात घेत अटक केली.
संतोष चव्हाण हा कोथरूडमधील राऊतवाडी परिसरातील रहिवासी असून, तो प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्यामागे नेमका काय हेतू होता, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.डीसीपी कृषीकेश रावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बापट यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु