एनआयएफटीच्या संयुक्त पदवीदान समारंभात मुंबईच्या 315 विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या संयुक्त पदवीदान समारंभाचे नुकतेच नवी दिल्लीत यशोभूमी येथे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे एकूण 315 विद्यार्थी या पदवीदान समार
राष्ट्रपती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पदवीदान समारंभ


नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या संयुक्त पदवीदान समारंभाचे नुकतेच नवी दिल्लीत यशोभूमी येथे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे एकूण 315 विद्यार्थी या पदवीदान समारंभात सहभागी झाले. या समारंभात एनआयएफटीच्या देशातल्या 18 संकुलातले पदवीधर विद्यार्थी देखील या समारंभात आपल्या शैक्षणिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि व्यावसायिक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सहभागी झाले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पदवीदान समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह; वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव; एनआयएफटीच्या महासंचालक तनू कश्यप, आयएएस; नियामक मंडळाचे सदस्य; एनआयएफटी मुंबईचे संचालक प्रा. डॉ. अजित कुमार खरे, इतर एनआयएफटी संकुलांचे संचालक आणि इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना, राष्ट्रपतींनी त्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाशी आणि मूल्यांशी जोडलेले राहून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी प्रोत्साहित केले. डिझाइन आणि मार्केट लिंकेजद्वारे विणकर आणि कारागिरांना पाठबळ देणाऱ्या एनआयएफटीच्या 'क्राफ्ट क्लस्टर' उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी शाश्वतता, स्थानिक साहित्याचा वापर आणि कापड कचऱ्याचे रिसायकलिंग याच्या आवश्यकतेवरही भर दिला. राष्ट्रपतींनी पदवीधरांना पारंपारिक कारागिरांना सहकार्य करण्याचे आणि नवोन्मेष, सामाजिक जबाबदारी व सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून 'विकसित भारत 2047' च्या संकल्पामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी पदवीधरांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, कठोर परिश्रम करण्याचे आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. वस्त्रोद्योग सचिवांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना सतत शिकत राहण्यासाठी व कौशल्य विकासासाठी प्रोत्साहित केले.

या सोहळ्यात एनआयएफटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी, सर्जनशीलता, नवोन्मेष आणि व्यावसायिक गुणवत्तेबद्दल 10 सुवर्णपदके, 31 पदवी समारंभ पुरस्कार आणि 16 विशेष गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

एनआयएफटीच्या महासंचालकांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली आणि प्रतीकात्मक पदव्या प्रदान केल्या. त्यानंतर विविध संकुलाचे पदवी वितरण सोहळे संपन्न झाले. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताने पदवीदान समारंभाची सांगता झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande