चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीत बंद
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सलग चार व्यवहाराचे दिवस घसरणीचा सामना करणाऱ्या देशांतर्गत शेअर बाजाराला जन्माष्टमीच्या दिवशी काहीसा दिलासा मिळाला. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात मोठ्या प्रमाणात नफा-वसुली झाली असतानाही शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक स
Stock Market Closing


नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सलग चार व्यवहाराचे दिवस घसरणीचा सामना करणाऱ्या देशांतर्गत शेअर बाजाराला जन्माष्टमीच्या दिवशी काहीसा दिलासा मिळाला. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात मोठ्या प्रमाणात नफा-वसुली झाली असतानाही शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी आज सकारात्मक पातळीवर व्यवहाराची सांगता केली. मात्र, मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४१ हजार कोटी रुपयांची घट झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ५०४.१६ अंकांच्या म्हणजेच ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह ७६,६५७.०२ अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या २० मिनिटांत काही प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला. त्यानंतर खरेदीला सुरुवात झाल्याने सेन्सेक्सने चांगली वाढ नोंदवली. दुपारी १२ वाजण्याच्या काही वेळ आधी सेन्सेक्स ७३०.२८ अंकांच्या म्हणजेच ०.९६ टक्क्यांच्या वाढीसह ७६,८८३.१४ अंकांवर पोहोचला. मात्र, दुसऱ्या सत्रात नफा-वसुलीमुळे निर्देशांकाच्या वाढीला ब्रेक लागला. अखेर सेन्सेक्स ३६२.५७ अंक म्हणजेच ०.४८ टक्क्यांच्या वाढीसह ७६,५१५.४३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३७.४५ अंक म्हणजेच ०.१६ टक्क्यांच्या वाढीसह २३,९१०.९० अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीचा दबाव असला तरी त्यानंतर खरेदी वाढली. त्यामुळे निफ्टी १३२.३० अंकांच्या वाढीसह २४,००५.७५ अंकांवर पोहोचला. मात्र, दुसऱ्या सत्रात नफा-वसुलीमुळे निफ्टीची वाढ कमी झाली. अखेर निफ्टी २४.२५ अंक म्हणजेच ०.१० टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह २३,८९७.७० अंकांवर बंद झाला.

आज धातू क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा धातू निर्देशांक १.४२ टक्क्यांनी वाढला. तेल आणि वायू, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, एफएमसीजी आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्रातील निर्देशांकही तेजीत बंद झाले. दुसरीकडे, स्थावर मालमत्ता, माहिती-तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव राहिला. बँकिंग, वाहन आणि भांडवली वस्तू क्षेत्राचे निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. मध्यम आकाराच्या समभागांवरील दबावामुळे बाजारमूल्यात घट झाली. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४८८.३१ लाख कोटी रुपयांवर आले. मागील व्यवहाराच्या दिवशी ते ४८८.७२ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे ४१ हजार कोटी रुपयांचा फटका बसला.

दिवसभरातील व्यवहारादरम्यान, एनएसईवर ३,२४१ शेअर्समध्ये सक्रियपणे व्यवहार झाला. यापैकी १,८०८ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,४३३ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या ३० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर ११ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीवर सूचीबद्ध असलेल्या ५० शेअर्सपैकी २२ शेअर्स वाढीसह आणि २८ शेअर्स घसरणीसह बंद झाले.आज एसबीआय लाइफ इन्शुरन्स, टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ट्रेंट हे प्रमुख तेजीचे समभाग ठरले. तर एचसीएल टेक्नॉलॉजी, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, कोल इंडिया आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande