
रत्नागिरी, 4 सप्टेंबर (हिं.स.) । विद्याभारती पश्चिम क्षेत्राच्या वतीने आयोजित पश्चिम क्षेत्रीय खेलकूद स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाल्या. यावर्षी खेलकुद स्पर्धांचे यजमानपद विद्याभारती कोंकण प्रांताला मिळाले होते.
या स्पर्धांमध्ये खो-खो, योगासन, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. गुजरात, अकोला, नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, धाराशिव, अंबरनाथ, दापोली, इत्यादी पश्चिम क्षेत्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या दोनशेहून अधिक स्पर्धक व प्रशिक्षकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडाकौशल्याचे दर्शन घडविले.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक बाबा चांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक ईश्वर पटेल, तसेच विद्याभारती पश्चिम क्षेत्राचे कोषाध्यक्ष प्रशांत आठले यांची विशेष उपस्थिती होती. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते व प्रसिद्ध मल्लखांबपटू वामनराव जोशी प्रमुख पाहुणे होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती चिपळूण गुरुकुलचे एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा चांदेकर यांनी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासासोबतच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांची जोपासना होते. त्यामुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा शिक्षणाला विशेष महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. स्पर्धांचे आयोजन शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.
तीन दिवसांच्या स्पर्धेच्या आज झालेल्या समारोप सत्राला संयोजन समितीच्या कार्यवाह छायाताई मुसळे, कोषाध्यक्षा स्वाती ढोल्ये, शरदराव मुसळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्याभारतीच्या शिक्षणपद्धतीतील पाच मूलभूत विषयांपैकी शारीरिक शिक्षण या विषयाला या स्पर्धांमुळे कोकणात निश्चितच अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी क्रीडा शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ गुरुकुल, आयोजन कार्यसमिती, पंच, रेफरी, स्वयंसेवक तसेच एसव्हीजेसीटीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व खेलकुद कोकण प्रांत संयोजक प्रमोद पारसी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
स्पर्धेतील गुणानुक्रमे विजेते असे -
ॲथलेटिक्स स्पर्धा -
१०० मीटर धावणे - १४ वर्षांखालील - मुली -
सार्थकी दाभोळे (एजी हायस्कूल, दापोली), स्वरा पाष्टे (विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ).
गोळाफेक - १७ वर्षांखालील - मुलगे - सर्वेश पुलेकर (एजी हायस्कूल दापोली), अद्वैत जाधव (विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ)
खो-खो - १४ वर्षांखालील -मुली -
विजेता संघ - गांधी विद्यालय चिखली, जि. धाराशिव, देवगिरी प्रांत.
मुलगे विजेता संघ - विदर्भ प्रांत
१७ वर्षांखालील मुलगे - विजेता संघ - विदर्भ प्रांत
१७ वर्षांखालील - मुली - विजेता संघ - गांधी विद्यालय चिखली, जि. धाराशिव, देवगिरी प्रांत.
व्हॉलीबॉल
१७ वर्षांखालील - मुलगे - विजेता संघ - TBRANs मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, नागपूर, विदर्भ प्रांत.
मुली - विजेता संघ - TBRANs मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, नागपूर, विदर्भ प्रांत.
योगासन
१७ वर्षांखालील - मुली - ट्रॅडिशनल योगा -
प्रीतिका संजय निकुळे, पं. बच्छराज व्यास विद्यालय, नागपूर, विदर्भ प्रांत.
आर्टिस्टिक सिंगल -
प्रीतिका संजय निकुळे, पं. बच्छराज व्यास विद्यालय, नागपूर, विदर्भ प्रांत.
आर्टिस्टिक पेअर -
प्रीतिका संजय निकुळे, मृण्मयी दीपक उताणे
पं. बच्छराज व्यास विद्यालय, नागपूर, विदर्भ प्रांत.
ऱ्हिदमिक पेयर -
सौम्या संजय साबळे,
मैत्रयी मंदार खटावकर
भाऊसाहेब परांजपे विद्यालय अंबरनाथ, कोकण प्रांत.
बॅडमिंटन
१७ वर्षांखालील - मुलगे
अंतिम निवड - आरुष दबडगाव, परिमल गावंडे, रुद्र झाडोकार (स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा, नागपूर), स्नेहराज राठोड, अमोघ जोशी (एजी हायस्कूल दापोली, कोकण प्रांत)
मुली - अंतिम निवड - विदर्भ प्रांत
आराध्या तुळजापुरे, पिहू राठोड, भावी झाडोकार, रिया राठी (स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ, तेल्हारा) जिनाल पाटील (मुक्ताई माध्यमिक विद्यालय, शहादा)
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी