बीडच्या डॉ. कविता गित्ते यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव
बीड, 05 सप्टेंबर (हिं.स.)। उसाच्या फडात, तांड्यांवर तसेच दुर्गम वस्त्यांमध्ये भटकंती करणाऱ्या मुलांच्या हातातील ‘कोयता’ काढून त्यांच्या हाती ‘माऊस’ आणि पुस्तके देणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. क
Q


बीड, 05 सप्टेंबर (हिं.स.)। उसाच्या फडात, तांड्यांवर तसेच दुर्गम वस्त्यांमध्ये भटकंती करणाऱ्या मुलांच्या हातातील ‘कोयता’ काढून त्यांच्या हाती ‘माऊस’ आणि पुस्तके देणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता गित्ते यांनाभारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अनेक वर्षांपासून वंचित, उपेक्षित आणि शाळाबाह्य मुलांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉ. गित्ते यांच्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले

गेल्या 29 वर्षांपासून शिक्षण प्रसाराचे कार्य अविरतपणे करणाऱ्या डॉ. कविता गित्ते यांनी केवळ वर्गातील अध्यापनापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हाची पर्वा न करता त्या स्वतः उसाच्या फडांमध्ये, भटक्या समाजाच्या तांड्यांवर आणि दुर्गम वस्त्यांमध्ये पोहोचत. तेथे पालकांचे समुपदेशन करून त्यांनी हजारो शाळाबाह्य मुलांना निवासी शाळेच्या प्रवाहात आणले.

2005 पासून शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी विशेष तासिका घेण्याची व्यवस्था त्यांनी सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी इयत्ता सहावीपासूनच वेल्डिंग, प्लंबिंग आणि हस्तकलेसोबत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) लॅब उभारण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्रगत शिक्षण दिले जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही त्यांनी शाळेत अभिनव प्रयोग राबवला. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून सेंद्रिय पद्धतीने भाज्यांचे उत्पादन घेतले जाते आणि या भाज्यांचा विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात समावेश केला जातो.

समुपदेशनातून बदलली सामाजिक मानसिकता

सामाजिक बांधिलकी जपत डॉ. गित्ते यांनी शेकडो मुलींचे बालविवाह रोखण्यासाठीही प्रभावी काम केले. पथनाट्य आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती करत मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आतापर्यंत 10 हजारांहून अधिक मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. चार ते पाच वर्षे शिक्षणापासून दूर राहिलेली अनेक मुले पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली. बालविवाहाच्या विळख्यातून मुक्त झालेल्या अनेक मुलींना सुरक्षित वातावरणात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. गित्ते यांच्या कुशल नेतृत्वामुळे शाळेला ‘आयएसओ’ (ISO) मानांकन मिळाले. ‘माझी सुंदर शाळा’ अभियानात शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शाळेतील खेळाडूंनी सॉफ्टबॉल आणि बेसबॉल स्पर्धांमध्ये 210 हून अधिक पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘कोयता बंद, माऊस हाती’ अभियानाचा संकल्प

भविष्यात ‘कोयता बंद, माऊस हाती अभियान’ अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा डॉ. गित्ते यांचा मानस आहे. यासोबतच व्यसनमुक्ती केंद्र उभारणे आणि ऊसतोड कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना शासकीय योजनांचा व हक्कांचा लाभ मिळवून देण्याचेही त्यांचे उद्दिष्ट आहे. “ज्या मुलांच्या जन्माची नोंद उसाच्या फडात होते, त्यांच्या कर्तृत्वाची नोंद उद्या देशातील मोठे अधिकारी आणि नामांकित खेळाडूंच्या यादीत व्हावी, हाच माझ्या आयुष्याचा ध्यास आहे,” असे डॉ. गित्ते सांगतात. त्यांच्या या शब्दांतून वंचित मुलांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची प्रखर निष्ठा आणि ध्येयवाद स्पष्टपणे दिसून येतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande