
* जम्मूत सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाला यश
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी कमांडर यासिर ठार झाला आहे. ही मोहीम विशेष दल आणि ५३ व्या राष्ट्रीय रायफल्सने संयुक्तपणे राबवली. ‘ऑपरेशन अशदार’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानचा नागरिक आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. सुरक्षा दलांनी त्याचा खात्मा ही मोठी कामगिरी असल्याचे म्हटले आहे. बडगाम जिल्ह्यातील अशदार गली परिसरात शुक्रवारी या कारवाई दरम्यान एक दहशतवादी ठार झाला.
लष्कराच्या चिनार कोअरने ‘एक्स’वर पोस्ट करत या कारवाईची माहिती दिली. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे अशदार गली परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. परिसरात दहशतवाद्यांच्या हालचाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण भागाला घेराव घातला.
शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलाच्या जवानांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या. जवानांनी संशयितांना आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.
या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. कारवाईनंतर घटनास्थळावरून एके-47 रायफलसह युद्धसामग्री आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ठार झालेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे आणि तो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे तपासातून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यासिर लश्कर-ए-तोयबाच्या सुलेमान मुसा गटाचा भाग होता. मात्र, तो सुमारे वर्षभरापूर्वी गटापासून वेगळा झाला होता आणि तेव्हापासून स्वतंत्रपणे कार्यरत होता. सुरक्षा यंत्रणा काही काळापासून युसमार्ग भागातील त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. गटापासून वेगळे झाल्यानंतर यासिर या भागात लश्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून उदयास आला होता. युसमार्गच्या उंच भागातील त्याच्या उपस्थितीमुळे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी