
लातूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मौजे कव्हा येथील कोळी गल्ली परिसरात छापा टाकून घराच्या बाजूच्या खुल्या जागेत करण्यात आलेली अवैध गांजाची लागवड उघडकीस आणली. या कारवाईत १३ किलो ६५२ ग्रॅम हिरवी गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ८२ हजार ६०० रुपये इतकी आहे.
गुप्त बातमीदारामार्फत मौजे कव्हा येथील एका व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खुल्या जागेत अवैधरित्या गांजाची झाडे लावल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीची सत्यता पडताळून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे सूचनेनुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर, यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, नायब तहसीलदार, लातूर, सतीश कांबळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासकीय कर्मचारी यांना पंच म्हणून तसेच प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या भ्रमण वैज्ञानिक पथकाला, व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार यांना सोबत घेऊन सायंकाळी कव्हा येथील कोळी गल्ली परिसरात जाऊन संशयित व्यक्तीचा शोध घेतला. यावेळी मुक्तार गफुरसाब शेख (वय ४५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कोळी गल्ली, कव्हा, ता. जि. लातूर) हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात आढळून आला.नायब तहसीलदार, शासकीय पंच व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित जागेची तपासणी केली असता घराच्या शेजारील खुल्या जागेत गांजाची झाडे लावून त्यांची निगा राखण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सदर झाडे उपटून वैज्ञानिक पथकाच्या मदतीने त्यांचे वजन केले असता, गांजाचे एकूण वजन १३ किलो ६५२ ग्रॅम आढळून आले. प्रति किलो ५० हजार रुपये दराने जप्त गांजाची एकूण किंमत ६ लाख ८२ हजार ६०० रुपये इतकी असून ते
जप्त करण्यात आले व दोन पोत्यांमध्ये भरून सीलबंद करण्यात आला. संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.
या प्रकरणी मुक्तार गफुरसाब शेख याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सफौ. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis