
चेन्नई, 06 सप्टेंबर, (हिं.स.) - कर्णधार इशान किशनच्या शतकाच्या जोरावर ईस्ट झोनने साऊथ झोनविरुद्ध दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्चस्वपूर्ण कामगिरी केली. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, ईस्ट झोनने पहिल्या डावात चार गडी गमावून ३८५ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा, इशान १३५ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि एका षटकारासह १११ धावांवर, तर कुमार कुशाग्र ७५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि पाच षटकारांसह ६३ धावांवर खेळपट्टीवर होता.
ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडून चांगली सुरुवात केली. ही भागीदारी चामा मिलिंदने वैभव सूर्यवंशीला बाद करून तोडली. वैभवने ३७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. दरम्यान, ईश्वरणने अर्धशतक झळकावले आणि १० चौकार व एका षटकाराच्या मदतीने ८६ चेंडूंमध्ये ७२ धावा करून तो धावबाद झाला.
सुदीप कुमार फार काही करू शकला नाही आणि त्रिपुराण विजयने त्याला सहा धावांवर बाद केले. त्यानंतर शिखर मोहनने कर्णधार इशानसोबत ९४ धावांची भागीदारी केली. शिखरने नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२० चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या आणि त्यानंतर तो मिलिंदच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर इशान आणि कुशाग्र यांनी शानदार फलंदाजी केली आणि एकही गडी बाद होऊ दिला नाही. आतापर्यंत या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली आहे. इशानने शतक झळकावले आहे, तर कुशाग्र अर्धशतकावर नाबाद आहे. ईस्ट झोनचा आता दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभणारण्यावर भर असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे