अमरावती- तरुणीवर वाघाचा हल्ला; जागीच मृत्यू
अमरावती, 07 सप्टेंबर (हिं.स.) । चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात चाराकटाईसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय मुलीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. ऊर्मिला बाजी
वाघाच्या हल्ल्यात मुलगी ठार


अमरावती, 07 सप्टेंबर (हिं.स.) । चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात चाराकटाईसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय मुलीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. ऊर्मिला बाजीराव इवने, असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे सोनोरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबतही ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऊर्मिला ही सोनोरी शेतशिवारात चाराकटाई करण्यासाठी गेली होती. यावेळी वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी वनविभागावर रोष व्यक्त केला. वाघ असल्याची माहिती देण्यात आल्यावर देखील या विभागाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे एका मुलीचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रवीण तायडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, चांदूरबाजारचे तहसीलदार योगेश गाडे, चांदूरबाजारचे ठाणेदार सोनोने व ब्राम्हणवाडा थडीचे ठाणेदार जाधव, चांदूरबाजारच्या एसडीपीओ तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी गावात दाखल झाले होते.

आमदार प्रवीण तायडे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचा समाचार घेतला. या घटनेची तातडीने दखल घेत आमदार प्रवीण तायडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत परिसरात आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आमदार गावात दाखल झाले व त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. घडत असलेल्या घटनेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच तासले. वाघाने मुलीचा बळी घेतल्याने तिच्या कुटुंबीयांना वनविभागाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आमदार प्रवीण तायडे व सुरेखाताई ठाकरे यांनी रेटून धरली. सोनोरी गावात या घटनेने रात्रीपर्यंत तणावाची स्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande