पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्ड्रीफ कफ सिरपच्या सेवनाने बालकांचा मृत्यू झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी पुण्यात २० औषधविक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटीस व निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे जिल्हा औषध विक्रेत्या संघटनेने केवळ औषध विक्रेत्यांवरच लक्ष केंद्रित न करता, बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्या व ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी ‘एफडीए’कडे केली आहे.
मध्य प्रदेशात ‘कोल्ड्रीफ’ पिल्यानंतर ९ हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. या कफ सिरपमध्ये ‘डायथीलिन ग्लायकॉल’ हे विषारी रसायन आढळून आले. त्यानंतर ‘एफडीए’ने या कफ सिरपची विक्री व वितरण बंद केले. त्यानंतर देशभरात इतर कंपन्यांच्या कफ सिरपची तपासणी सुरू केली. त्यामध्ये ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रेसिफ्रेश टीआर’ व ‘शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रिलाईफ’ या दोन कफ सिरपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ‘डायथीलिन ग्लायकॉल’ आढळले. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांचा साठा प्रतिबंधित करून, त्याच्या वितरणावर देशभरात बंदी घातली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु