आणखी किती वेळा हंबरडा फोडणार - एकनाथ शिंदे
मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, खासदार पडले तेव्हा हंबरडा फोडला आणि विधानसभा निवडणुकीत आमदार पडले, तेव्हा हंबरडा फोडला, आता आणखी किती वेळा हंबरडा फोडणार आहात, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक
एकनाथ शिंदे


मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.) - मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, खासदार पडले तेव्हा हंबरडा फोडला आणि विधानसभा निवडणुकीत आमदार पडले, तेव्हा हंबरडा फोडला, आता आणखी किती वेळा हंबरडा फोडणार आहात, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हंबरडा मोर्चावर टीका केली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या पॅकेजवर टीका करणारे उद्धव ठाकरे हे पैठण येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेटायला गेले, तेव्हा ते एक लाख रुपयांचा धनादेश देणार होते, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्या शेतकऱ्याला एक फुटकी कवडीही त्यांनी दिली नाही. तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हाही तुम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही. नुसतेच रिकाम्या हाताने येता. त्यामुळे हंबरडा फोडायचा असेल, तर मुंबई हातून गेली की मग फोडा. जेव्हा कोणी बरोबर राहिले नाही, तेव्हाही तुम्ही तो फोडला होता. म्हणूनच शेतकऱ्यांनी तुम्हाला घरी बसविल्याची टीका शिंदे यांनी केली.

मला फक्त बाळासाहेब ब्रँड माहिती आहे, इतर कोणताही ब्रँड माहिती नाही, महापालिका निवडणुकीत महायुतीलाच यश मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कधी घराचा उंबरठा न ओलंडणारे आता हंबरडा फोडत आहेत. जेव्हा द्यायची वेळ होती तेव्हा आमचे हात रिकामे आहेत-रिकामे आहेत असंच यांचं सुरू होतं. राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, या वेळेस कोणी राजकारण करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा-बांधावर आम्ही जाऊन आलो. प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहायचं. म्हणून आम्ही एनडीआरएफचे निकष असतील, अटीशर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेऊन मोठ्या प्रमाणात भरीव देण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलं याच मला समाधान आहे. आम्ही 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, आम्ही म्हणालो होतो की, शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊन देणार नाही, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. आम्ही 47 हजार हेक्टरी मदत केली, जमीन खरडून गेलेल्या लोकांना पुन्हा मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी असे 3 लाख 47 हजार रुपये मदत केली. आतापर्यंतच्या इतिहासात इतकी मदत शेतकऱ्याला कधीच मिळाली नव्हती.

शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. हे करत आहेत ते निव्वळ राजकारण आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्या हातात बिस्कीटचा पुडा तरी ठेवला का? आम्ही मोठं मोठे किट पाठवले, त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी ही त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलं. हा कसला हंबरडा मोर्चा? हे उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेले राजकारण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande