रत्नागिरी, 12 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा पुरातन वारसा जतन करण्याचा प्रयत्न इमारतीची उभारणी करून केला जात आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
वाचनालयाच्या दुमजली इमारतीचे काम सुरू आहे केवळ ९ महिन्यांत ४००० चौरस फुटाचे सुसज्ज बांधकाम पूर्णत्वाला गेले आणि आज प्रशस्त वाचन विभागाचे उद्घाटन उद्योजक दीपक गद्रे, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी, डॉ आलिमिया परकार, डॉ. श्रीरंग कद्रेकर, अभिजित हेगशेट्ये यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील सर्वांत जुने ऐतिहासिक परंपरा असलेल्या या वाचनालयाचा समृद्ध वारसा नव्या युगासमोर सुसज्ज स्वरूपात यावा, यासाठी जीर्ण झालेल्या वास्तूला नवीन स्वरूपात उभारण्याच आमचे कर्तव्य होते. ते चोख बजावता येत आहे, याचे समाधान लाख मोलाचे आहे, असे भावोद्गार ॲड. पटवर्धन यांनी यावेळी काढले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात लीज अॅग्रिमेंटसाठी केलेला २४ वर्षांचा संघर्ष त्यात निग्रहाने अथक पाठपुराव्याने मिळालेले यश याची रंजक माहिती उपस्थितांसमोर ठेवली. रत्नागिरी नगर वाचनालय शासन चालवत नाही. त्यासाठी पैसा उभा करावा लागतो. मात्र समाजामध्ये गैरसमज आहे की वाचनालय पूर्णावशाने शासन चालवते. जुनी इमारत जीर्ण झाली होती. केवळ कॉस्मेटिक ट्रीटमेंटने ती चांगल्या स्थितीत दिसत होती. त्यामुळे जीर्ण इमारतीला निरोप देणे आवश्यक होते. आजपर्यंत प्रयत्नांची शिकस्त करत पैसा उभारला आणि विक्रमी वेगाने ही प्रशस्त वास्तू उभी राहते आहे, असे अध्यक्ष म्हणाले.
नव्या युगाचे नवीन वाचनालय उभे करायचे स्वप्न साकारण्यासाठी आता मायदेश फाउंडेशन पुढे आले आहे. ऐतिहासिक संस्था संदर्भ जपण्यासाठी नव्याने उभारण्यासाठी भरपूर साधनांचा उपयोग करण्याची क्षमता असलेले मायदेश फाउंडेशन आता वाचनालयाला अद्ययावत स्वरूपात प्रस्थापित करेल. त्यासाठी वाचनालय पूर्ण सकारात्मकतेने मायदेश फाउंडेशन बरोबर कार्यरत राहील. असे सांगत या उभारणीमध्ये सहकार्य केलेल्या सर्वांचे ॲड. पटवर्धन यांनी आभार मानले.
या प्रसंगी मायदेश फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक अरुण जोशी यांनी आपले विचार व्यक्त करत या ऐतिहासिक वाचनालयाला नवा साज देताना ऐतिहासिक संदर्भ अधिक प्रकाशाने समोर यावेत, त्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी अनेक प्रकल्प राबवण्याचा मानस अरुण जोशी यांनी व्यक्त करत मायदेश फाउंडेशन करत असलेल्या अन्य विकासकामांबाबत माहिती दिली.
अभिजित हेगशेट्ये यांनी या वाचनालयाचे महत्त्व सांगणारे अनेक किस्से सांगितले. चंद्रशेखर पटवर्धन यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात वाचनालयाच्या इमारतीसाठी भरीव निधी देणाऱ्या संस्था, बँका, व्यक्ती यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये स्वरूपानंद पतसंस्था, विजय देसाई, सौ अरुणा पटवर्धन, दीपक गद्रे, सौ प्रभुदेसाई, श्रीमती सुखदा देव, देवेंद्र जोशी, रत्नागिरी मध्यवर्ती. सह बँक, मध्यवर्ती बँक कर्मचारी युनियन, सतीश कामत, संदीप कदम ,जयप्रकाश पाखरे, पितांबरी उद्योग, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी डॉ. सुहास कुलकर्णी आदी मान्यवरांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी