नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
- नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने वाढत्या अतिक्रमणामुळे गुन्हेगारांना लपण्यासाठी आणि थांबण्यासाठी ठिकाणे मिळत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र तरी देखील महानगरपालिकेच्या वतीने दिखाऊ अतिक्रमण हटाव मोहीम केली जात आहे. त्यामुळे अजूनही महानगरपालिका यातून कोणताही धडा घेण्यास तयार नाही तर अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शहरांमध्ये गुन्हेगारीला वाढती किनार मिळाली हे आता स्पष्ट झाले आहे.
नाशिक शहरात गुन्हेगारी वाढल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः पुढाकार घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि विशेष करून आरटीओ पंचवटी परिसरातील अतिक्रमण त्यांनी स्वतः उभे राहून हटविले कारण या ठिकाणी गुन्हेगारांना लपण्यासाठी उभे राहण्यासाठी नको ते उद्योग करण्यासाठी आवश्यक ती जागा मिळालेली होती आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे लक्षात आले होते. यानंतर शहरांमध्ये महानगरपालिका धडक कारवाई करेल अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा मात्र अपयशी ठरली.
वास्तविकरीत्या शहरांमध्ये अतिक्रमण वाढीस लागले तर त्यावर अतिक्रमण विभागाच्या वतीने सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा बेरोजगारीचे कारणे देण्यात येत होती परंतु अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेच्यावतीने फक्त दिखाओ मोहीमच आज पर्यंत झाली त्यापुढे काहीच झाले नाही त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत गेली गुन्हेगारांचे अड्डे वाढत गेले पण महापालिकेने त्याकडे जाणून-बुजून लक्ष केल्याचे समोर आलेले आहे आजही पोलिसांनी ही सर्व बाब समोर आल्यानंतर महापालिकेकडून फक्त दिखाऊ कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात ज्या पद्धतीने धडक म्हणून व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि होते ही नाहीये. आज महापालिका अतिक्रमण काढते त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे अगदी याच आठवड्यामध्ये आरटीओ परिसरामध्ये झालेल्या अतिक्रमण मोहिमेनंतर समोर आले आहे. या दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर हे दुकानदार आमचे महापालिकेत बोलणे झाले आहे असे सांगून सरळपणे अतिक्रमण करीत आहेत पण कोणाशी बोलले झाले हे मात्र सांगत नाही एकूणच शहरातील वाढत्या गुन्हेगारीला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पाठबळ असल्याचे देखील समोर येत आहे आता तरी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यातून काही निर्णय घेणार का याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV