रत्नागिरी : मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सेरेब्रल पाल्सीबद्दल मार्गदर्शन
रत्नागिरी, 12 ऑक्टोबर, (हिं. स.) : मुकुल माधव फाउंडेशन व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन व जागरूकता कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाख
मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सेरेब्रल पाल्सीबद्दल मार्गदर्शन


रत्नागिरी, 12 ऑक्टोबर, (हिं. स.) : मुकुल माधव फाउंडेशन व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन व जागरूकता कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल पेडिॲटिक ऑर्थोपेडिक, पुण्याच्या संचेती हॉस्पिटलचे डॉ. संदीप पटवर्धन, न्युरो डेव्हलपमेंट डॉ. लीना श्रीवास्तव व न्युरोफिजिओथेरेपिस्ट सलोनी राजे यांनी सेरेब्रल पाल्सी आजाराचे निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, डॉ. अर्जुन सुतार, मुकुल माधव फाउंडेशनचे डॉ. अनुप करमरकर, अभिजित साळवी, बबलु मोकळे उपस्थित होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. शाहीन पावसकर व जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका कॉलेजच्या विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सेरेब्रल पाल्सी या आजाराची मुख्य लक्षण म्हणजे हालचाल आणि समन्वयातील अडचणी, जसे की, स्नायूंची ताठरता किंवा सैलपणा असंतुलन आणि अनैच्छिक हालचाली. याव्यतिरिक्त बोलणे, गिळणे खाणे, झोपणे किंवा डोळे नियंत्रित करणे यासारख्या कार्यांमध्ये अडचणी येऊ शकते. तसेच काही प्रकारांमध्ये झटके आणि मानसिक आरोग्याच्या समस्यादेखील दिसून येतात. सेरेब्रल पाल्सी ही एक न्युरोलॉजिकल स्थिती आहे जी स्नायूंच्या टोन किंवा हालचालींच्या विकाराच्या समस्या म्हणून प्रकट होऊ शकते. गर्भाच्या विकासादरम्यान मेंदूला झालेल्या नुकसानाचा किंवा मेंदूच्या विकासावर परिणाम करणाऱ्या इतर विकासात्मक अपंगत्वाचा हा परिणाम आहे. सीपीची लक्षणे बालपणात लवकर दिसून येतात आणि व्यक्तीनुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. सीपीचा मुख्य परिणाम असा आहे की तो स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. याचा परिणाम मेंदूच्या जवळच्या भागांवर आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्षमतांवरदेखील होऊ शकतो. सीपीमुळे एखाद्या बाळाला बौद्धिक अपंगत्व येऊ शकते. परंतु वेळीच उपचाराने आणि थेरपीने हा आजाराची तीव्रता कमी होऊ शकते.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीईआयसी विभागात विशेषज्ञांकडून विविध प्रकारच्या 0 ते 6 या वयोगटातील मुलांच्या जन्मतः होणाऱ्या आजाराचे वेळीच निदान करून पुढील उपचारासाठी बालकांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीईआयसी विभागात दिल्या जाणाऱ्या या सेवांचा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande