संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी निमा व आर्टिलरी सेंटरचा पुढाकार
नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। - निमा हाऊस येथे स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या उपस्थितीत संरक्षण संबंधी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मिलिटरी (स्कूल ऑफ आर्टिलरी) व निमा यांच्यातील परस्पर सहकार्य आणि आत्म
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी निमा व आर्टिलरी सेंटरचा पुढाकार


नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

- निमा हाऊस येथे स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या उपस्थितीत संरक्षण संबंधी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मिलिटरी (स्कूल ऑफ आर्टिलरी) व निमा यांच्यातील परस्पर सहकार्य आणि आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरली.

बैठकीच्या सुरवातीला प्रास्ताविक करताना निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मांडलेल्या ५ पॉईंट अजेंड्यांतील प्रगतीविषयी माहिती दिली. त्यापैकी दोन प्रमुख मुद्दे - मेगा प्रोजेक्ट आणि सीपीआरआय लॅब चे उदघाटन तसेच इंडस्ट्रीयल प्रदर्शन केंद्र साठी जागा उपलब्ध करणे हे केवळ सात महिन्यांत पूर्ण झाल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी यावर्षी निमा तर्फे ४७ समित्यांची स्थापना करण्यात आली असून, प्रत्येक समिती उद्योग क्षेत्रातील विशिष्ट समस्येवर उपाययोजना करत असल्याचे नहार यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रात प्रचंड प्रमाणात संधी असल्याने उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

यानंतर लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांनी संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी आणि संशोधन-विकासासाठी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की नाशिकमध्ये असलेल्या उद्योगांकडे योग्य क्षमता असूनही डिफेन्स क्षेत्रासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू बाहेरून आयात कराव्या लागतात. यासाठी आत्मनिर्भर भारत उपक्रम राबवण्यात येऊन जास्तीत जास्त काम नाशिक जिल्ह्यातील उद्योगाने कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.HAL सारख्या मोठ्या उद्योग संस्थांना आवश्यक असलेल्या लहान मोठ्या घटकांचे उत्पादन नाशिकमधील उद्योगांनी का करू नये?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे सांगितले की, नाशिकमधील तरुणाईने या क्षेत्रात स्टार्टअप्स सुरू करून देशसेवेत योगदान दिले पाहिजे व आम्ही तरुणांना प्रोत्साहित व सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

लेफ्टनंट जनरल सरना यांनी पुढे म्हटले की, नाशिकमध्ये आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, औद्योगिक वातावरण आणि जागा उपलब्ध असूनही डिफेन्स क्षेत्रात स्थानिक उद्योजक पुढे येत नाहीत, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. त्यांनी खात्री व्यक्त केली की, योग्य तंत्रज्ञान आणि संधी ओळखल्यास नाशिकमधील उद्योगांना संरक्षण क्षेत्रात नक्कीच मोठी प्रगती साधता येईल व स्वरक्षण खाते देखील यासाठी आवश्यक मदत करेल. यासाठी आवश्यक असल्यास निर्वृत झालेल्या संरक्षण क्षेत्रातील अधिकारी त्यांच्या अनुभवाचा व शिस्तीचा वापर करून उद्योगांना मार्गदर्शन करण्यास तयार राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, मिलिंद राजपूत, नितीन आव्हाड, वैभव नागसेठीया, श्रीकांत पाटील, सचिन कंकरेज, नानासाहेब देवरे, रवींद्र पुंडे, दिपाली चांडक, जयश्री कुलकर्णी, प्रशांत जोशी, मयूर तांबे, हेमंत राख, जयप्रकाश जोशी यांसह अनेक उद्योजक आणि संरक्षण अधिकारी कर्नल नीरज चौधरी, लेफ. कर्नल रजत शर्मा, प्रशांत पतंगे, व्हाय सुरी, व्ही सोनवणे, सागर मटाले आदी उपस्थित होते. स्वागत श्रीकांत पाटील आणि आभार प्रदर्शन मनीष रावल यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande