लातूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले होते. अशी वक्तव्य करून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं नाही, तर पाठीत खंजीर खुपसल्याची भावना
विरोधकांनी वक्तव्य केली. या मस्तवाल सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी या निदर्शने आंदोलनात पुढाकार घेतला. दरवर्षी अतिवृष्टी, दुष्काळ, वाढते उत्पादनखर्च आणि तोट्याच्या भावात शेती करून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो, त्यातून त्याला मदतीचा हात द्यायचा सोडून त्याच्यावरच आरोप करणं म्हणजे सत्तेचा माज, मस्तीच म्हणावे लागेल.. तसही सत्तेच्या मखमली खुर्चीत बसल्यावर शेतकऱ्यांचं दुःख ऐकू येणं थांबत हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसुन येते.
निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा कोरा कोरा असे आश्वासन देऊन, शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं घसा ओरडून सांगत होते, तेव्हा हा नाद मतदान मिळवण्यासाठी होता का? आता सत्तेत आल्यावर तीच मागणी सहकार मंत्र्यांना नाद वाटते असे अनेकांनी सांगितले.
शेतकरी भीक नाही तर कर्जमाफीचा हक्क मागतोय, तो कधीही कोणासमोर झुकत नाही,जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला तर हाच शेतकरी राजा उदार होऊन तुम्हाला कर्ज देईल, आपण त्यांच्यासाठी चकार शब्द काढत नाही, लक्षात असु द्या वेळ आली तर शेतकरी रानातून, रणांगणातून आणि मतदानातून नक्कीच उत्तर देईल, सत्तेची मस्ती व अहंकार कामाचा नाही त्यामुळे सहकार मंत्र्यांनी अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नाक घासुन शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी केली,
याप्रसंगी माजी आमदार विनायकराव पाटील, सय्यद साजिद,भारत रेड्डी,चंद्रकांत मद्दे यांच्या सह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव आणि उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis