ठाणे, 12 ऑक्टोबर, (हिं.स.)। - ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार सुरु असून शहरात वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षदेखील पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
ठाणे महानगर पालिकेत सध्या नगरसेवक नाहीत. मात्र, राज्य सरकार पालिका चालवित आहे. अशा स्थितीत खाबूगिरी वाढली आहे. माॅडेल रोड, इतर रस्ते, उद्याने आदींची टेंडर काढून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. दुसरीकडे पाण्याची समस्या तीव्र आहे, रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याची समस्या तीव्र झाली आहे. या विरोधात काढण्यात येणारा हा मोर्चा म्हणजे जनतेचा आक्रोश असणार आहे, असे मनोज प्रधान म्हणाले.
दरम्यान, हा मोर्चा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथून सुरु होणार असून तो ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात ठाणे, कोपरी - पांचपाखाडी, ओवळा- माजिवडा, कळवा- मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असे प्रधान यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर