मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताने आता इतरांच्या दृष्टिकोनावर अवलंबून न राहता स्वतःची कहाणी, स्वतःचा विचार आणि स्वतःचा दृष्टिकोन जगासमोर मांडावा, असे आवाहन अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केले. मुंबईतील ‘व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल’ येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी भारताने चित्रपट, कथाकथन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जागतिक स्तरावर भारतीय ओळख दृढ करण्याची गरज अधोरेखित केली.
अदानी म्हणाले की, “विदेशातील लोक काय बोलतात यावर भारताने आता अवलंबून राहू नये. मौन म्हणजे विनम्रता नव्हे, तर ती शरणागती आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, हिंडेनबर्ग अहवालाचा वापर जणू एखाद्या हत्यारासारखा करून अदानी समूहावर नियोजनबद्ध हल्ले करण्यात आले आणि त्यामुळे सुमारे ८८ हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य संपुष्टात आले. ही घटना केवळ त्यांच्या समूहासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी डोळे उघडणारी ठरली, असे त्यांनी सांगितले.
गांधी आणि स्लमडॉग मिलियनेअर या चित्रपटांचा दाखला देत अदानी म्हणाले की, भारताच्या कथा पाश्चात्य दृष्टीकोनातून सांगितल्या गेल्या आहेत. “जर आपण स्वतःबद्दलची कथा स्वतः सांगितली नाही, तर इतर लोक ती त्यांच्या नजरेतून मांडतील आणि आपली ओळख त्यांच्या पूर्वग्रहातून घडेल,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे विचारले की, “महात्मा गांधींची कहाणी सांगण्यासाठी आपल्याला रिचर्ड अॅटनबरो यांच्यासारख्या विदेशी दिग्दर्शकाची का गरज भासावी?”
अदानी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीकडे राष्ट्राच्या सांस्कृतिक सॉफ्ट पॉवरच्या रूपात पाहावे, असे सांगितले. राज कपूर यांच्या आवारा या चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “या चित्रपटाने सोव्हिएत संघातील प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण केले. कपूर हे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे सर्वोत्तम प्रतिनिधी ठरले आणि त्यांनी भारत-सोव्हिएत संबंध अधिक मजबूत केले.”
हॉलिवूडच्या उदाहरणाचा उल्लेख करत अदानी म्हणाले, “अमेरिकन चित्रपट त्यांच्या सैन्याची ताकद, राष्ट्राभिमान आणि प्रभाव जगासमोर मांडतात. टॉप गन हा चित्रपट केवळ सिनेमा नाही, तर तो शक्तीचे प्रतीक आहे. त्यामागे एक अत्यंत नीट रचलेली कथा आहे जी अमेरिकन अभिमान आणि सैनिकी सामर्थ्याची ओळख जगाला करून देते. हे चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर ते धारणा बदलतात, देशाची ताकद दाखवतात आणि त्यांची ओळख परिभाषित करतात.”
त्यांच्या मते, भारतानेही आता आपल्या कथा जागतिक स्तरावर प्रामाणिकपणे आणि अभिमानाने सांगाव्यात. “आपण आपली कहाणी अहंकाराने नव्हे, तर प्रामाणिकतेने लिहिली पाहिजे; ती प्रचारकी थाटात नव्हे, तर उद्देशपूर्वक सांगितली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी, कथाकथन आणि नवतंत्रज्ञानाचा वापर करून जगात भारताची सर्जनशील ओळख निर्माण करण्यावर भर दिला.
या प्रसंगी त्यांनी व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनलचे संस्थापक सुभाष घई, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, अभिनेता कार्तिक आर्यन आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी त्यांना “भारताचे रत्न” असे संबोधले. “आपल्या देशातील तरुणांमध्ये राहणे नेहमीच ऊर्जादायक असते, आणि जेव्हा हा तरुण व्हिस्टलिंग वुड्ससारख्या संस्थेतून येतो तेव्हा ती ऊर्जा विजेसारखी पसरते,” असे अदानी म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावरही या भेटीचे फोटो शेअर करत सुभाष घईंच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हटले की, “तुमच्या संस्थेचा प्रत्येक कोपरा सर्जनशीलतेचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे.”
अदानी यांच्या मते, भारताचा आवाज आपल्या सीमांच्या आत ठाम आहे, पण त्या पलीकडे मंदावलेला आहे. “त्या शांततेत इतरांनी लेखणी उचलली आहे आणि त्यांच्या पूर्वग्रहातून भारताचे चित्र रंगवले आहे. आता आपणच आपल्या कहाणीचे लेखक व्हायचे आहे. आपण कोण आहोत, हे जगाला सांगण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असे ते म्हणाले.
अदानी यांनी शेवटी म्हटले की, भारताकडे जगाला प्रेरणा देणारी प्राचीन परंपरा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि तरुणाईची ऊर्जा आहे. “आपली कहाणी जर आपण स्वतः सांगितली, तर भारत केवळ आर्थिक महासत्ता नव्हे, तर सर्जनशील महासत्ता म्हणूनही उभा राहील,” असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule