लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारीची गंभीर घटना विठ्ठल किराणा दुकान समोर घडली. या घटनेत दोन्ही गटातील व्यक्ती जखमी झाले असून, एका व्यक्तीचे बोट गंभीररित्या तुटले आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील एकूण १३ व्यक्तींविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल; १३ आरोपींची नावे समोर
या घटनेनंतर अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा क्र. ६७४/२०२५ (फिर्यादी- नरसिंग देविदास पवार)
फिर्यादी नरसिंग देविदास पवार (वय ४०, रा. हडोळती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास विठ्ठल किराणा दुकान समोर, आरोपी १. असलम महामुद पठाण (वय-२८), २. अरबाज महामुद पठाण (वय-२६), ३. अजमद चां० देखा पठाण (वय-२९), ४. अहमद चांद खा पठाण (वय-४८), ५. याखुब गुडसुरकर (वय-२७), ६. खादर जिलानी पठाण (वय-२८), ७. सरदार पठाण, ८. खाजा मौला शेख (वय-२८), ९. मुजमिल बकास पठाण (वय-२६) व इतर दोन अशा ११ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून, सिमेंट कमी किमतीत का विकले आणि मागील भांडणाची कुरापत काढून हल्ला केला. आरोपी असलम पठाण याने दगडाने फिर्यादीच्या हनुवटीवर मारून जखमी केले. तर अरबाज पठाण याने लोखंडी सळईने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी विठ्ठल किराणा दुकानात लपले असता, आरोपींनी दुकानाच्या शटरवर दगड मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १०९, ११८ (१), १८९ (२), १९१ (२), (३), ३५१ (२) (३), ३५२, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि आनंद श्रीमंगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गुन्हा क्र. ६७५/२०२५ (फिर्यादी- अरबाज महमुद पठाण)
दुसऱ्या घटनेत, अरबाज महमुद पठाण (वय २९, रा. हडोळती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५:०५ वाजता विठ्ठल किराणा दुकान समोर, आरोपी १. नरसिंग देविदास पवार (वय ४० वर्षे) व २. नितीन देविदास पवार (वय ३२ वर्षे) या दोघांनी संगनमत करून, कामावर असलेल्या ड्रायव्हरला फूस लावण्याच्या कारणावरून हल्ला केला. आरोपी नरसिंग पवार याने हातातील कुऱ्हाडीने डोक्यात वार केला, जो फिर्यादीने चुकवला. तेव्हा आरोपी नितीन पवार याने हातातील धारदार लोखंडी सुरीने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला. हा वार चुकवण्याच्या प्रयत्नात फिर्यादीच्या डाव्या हाताचे अंगठ्याशेजारील बोट तुटले आणि मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १०९, १२६ (२), ३५१ (२) (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि केदासे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून एका गटातील मारहाण होत असलेल्या व्यक्तीला बाजूच्या दुकानात सुरक्षित बंद केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून बसले होते. जखमींना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत काही आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis