नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सने पराभव केला. भारताने विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य तीन विकेट्स गमावून पार केले. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने १ बाद ६३ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. साई सुदर्शन (३९ धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (१३) या दोघांना कॅरेबियन संघाला बाद करण्यात यश आले. केएल राहुलने आपले २० वे कसोटी अर्धशतक झळकावले. आणि सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५८ धावांवर नाबाद तो राहिला. ध्रुव जुरेल सहा धावांवर नाबाद राहिला. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि १४० धावांनी जिंकली होती.
भारताने आपला पहिला डाव पाच बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २४८ धावांवर ऑलआउट झाला आणि २७० धावांनी टीम इंडायाने आघाडी घेतली. भारताने फॉलोऑन लागू करण्याचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३९० धावा केल्या. वेस्ट इंडिजची एकूण आघाडी १२० धावांवर होती आणि भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य होते, जे टीम इंडियाने तीन विकेट्स गमावून पूर्ण केले.
शुभमन गिलचा कर्णधार म्हणून हा पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत गिलने कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. पण ती मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. आता गिलने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात धमाकेदारपणे केली आहे. त्याने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देऊन सुरुवात केली. भारताला आता नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे