नाशिक, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। पोलिसांच्या क्रिडा स्पर्धांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयातील खेळाडूंनी देशभर लौकीक मिळविला असून सांघिक भावनेतून कोणत्याही स्पर्धा यशस्वी करता येतात, खेळांच्या माध्यमातून आपला विकासही साधता येतो, असे प्रतिपादन नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे (एनएमआरडीए) आयुक्त जलज शर्मा यांनी केले.
पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ३६ व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वैयक्तिक व सांघिक प्रकारातील १६ खेळांच्या स्पर्धा पुढील तीन दिवस रंगणार आहे.पोलीस कवायत मैदानावर १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा होत असून क्रीड़ा ज्योत प्रज्वलीत करून शर्मा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, किरिथिका सी. एम., किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके उपस्थित होते. सुत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी केले. उद्घाटनाच्यावेळी खेळाडूंचे संचलन पार पडले. पोलीस मुख्यालय, परिमंडल एक, पोलीस आयुक्त कार्यालय, परिमंडल दोन या चार संघाच्या खेळाडूंनी संचलनात सहभाग घेतला. बास्केटबॉलमधील राष्ट्रीय खेळाडू आकिब पठाण, हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू मनिषा ताजनपुरे, राष्ट्रीय जलतरण खेळाडू ज्ञानेश्वर कातकाडे, राष्ट्रीय ज्युदो खेळाडू, सुनिता साबळे, राष्ट्रीय वेटलिफ्टींग / बॉडीबिल्डींग खेळाडू संदिप निकम, राष्ट्रीय अॅथेलेटीक्स् खेळाडू मंजू सहानी, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू महेश गवते, मिस महाराष्ट्र खेळाडू प्रियंका झाल्टे हे संचलनात सहभागी झाले. राष्ट्रीय अॅथेलेटिक्स खेळाडू संतोष बुचडे मशालधारक होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV