जळगाव , 14 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यात एकीकडे वाळू माफियांनी धुमाकूळ घेतला असून यातच वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजारांची लाच घेताना भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल व खाजगी पंटर जळगाव एलसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.नुकतीच चोपड्यात अवैध वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यात वाढताना दिसत असून जिल्ह्यात वाळू वाहतूक बंद असलीतरी वरिष्ठांच्या आदेशाने बिनदिक्कतपणे वाळू सुरू आहे अशातच भुसावळला वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजारांची लाच मागण्यात आली होती. या लाच मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या पथकाने लगेच सापळा रचत भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी नितीन केले (रा.वराडसीम) याच्यासह अन्य दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना सोमवारी रंगेहात पकडले. ही धडक कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर