नांदेड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नांदेड शहर व जिल्ह्यात पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या पुढाकाराने अकरा ठिकाणी ‘पोलीस जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात अनेक नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ तोडगा काढण्यात आला.
तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेला नांदेड जिल्हा राज्याच्या गृह विभागाकडून ‘अतिसंवेदनशील’ म्हणून घोषित आहे. या जिल्ह्याला विदर्भाचीही सीमा लागते. जिल्ह्यात एकूण 36 पोलीस ठाणे असून, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत (छत्रपती संभाजीनगर वगळता) येथे विविध प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज 100 पेक्षा अधिक रेल्वे धावतात. त्यामुळे गुन्हे करून इतर राज्यात पलायन करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. नवनवीन गुन्हेगारी पद्धती उदयास येत असल्याने त्यांची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद वाढवून विश्वासाचे नाते दृढ व्हावे, तसेच गुन्हेगारीविरोधात नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’, ‘निर्भया मिशन’, ‘दामिनी पथक’ यांसह महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत.
या मोहिमेअंतर्गत नांदेड शहरातील सहा आणि ग्रामीण भागातील पाच पोलीस ठाण्यांत ‘जनता दरबार’ घेण्यात आला. सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी स्वतः भाग्यनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावून नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि अनेक प्रकरणांत तत्काळ मार्ग काढला.
दरम्यान, नागरिकांनी रात्री गस्त कमी असणे, मनुष्यबळाची कमतरता, तक्रारींवर विलंबाने प्रतिसाद मिळणे यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. पोलिस अधीक्षकांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
जनता दरबारानंतर सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या, नागरिकांशी अधिक सुसंवाद ठेवण्याच्या आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन घडविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नांदेड जिल्ह्यात पोलिस आणि नागरिक यांच्यातील हा थेट संवाद पुढील काळात अधिक विश्वासार्ह आणि परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis