कोल्हापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा निघृण खून केला. हा प्रकार बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरात भारतनगरमध्ये घडला. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव असून, हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याला राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली.
घटनास्थळ आणि राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच राजेंद्रनगर जवळील भारतनगर येथील घरात राहत होते. विजय हा व्यसनी असल्याने त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर येथे जाऊन राहिल्या आहेत. सेंट्रिंग काम आणि डिजिटल फलक लावण्याचे काम करणारा विजय सतत दारूसाठी आईला त्रास देत होता.
आज सकाळीही दारूच्या नशेत तो आईकडे पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा खून केला. त्यानंतर त्यानेच इस्पुर्ली येथील बहिणीला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली. शेजा-यांनाही घटनेची माहिती देऊन तो दारात बसला होता. परिसरातील नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी येऊन हल्लेखोर विजय निकम अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar