पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
हिंजवडी आयटी पार्कसह परिसरात अवजड वाहनांमुळे अपघात वाढले असून, काही जणांना जीवही गमावावा लागला आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अवजड वाहनांवर निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांनी आखून दिलेल्या वेळेतच अवजड वाहनांना प्रवेश आणि चालक नशेत नसल्याची तपासणी या बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने ज्या बांधकाम व्यवसायिकांची असतील त्यांची बांधकामेही थांबवण्यात येणार आहेत.हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांमुळे अपघात वाढले आहेत. याप्रकरणी आयटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यात हिंजवडीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेतच अवजड वाहने शहरात यावीत, या नियमाचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम व्यावसायिकांनी याबाबत खबरदारी घ्यावयाची आहे. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी रहदारीच्या नियमांचे पालन करावे. वाहनचालक नशेत नसल्याची आणि त्याचा परवाना अद्ययावत असल्याची खात्री करून एकत्रित माहिती विकासकाने त्याच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवावी, असे निर्णयही घेण्यात आले. पोषण आहार योजनेसाठी शाळांना आर्थिक अडचणींना तोंड राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेचा निधी शाळांना गेल्या चार महिन्यांपासून मिळालेला नाही. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून निधीच मिळालेला नसल्याने पोषण आहार योजनेसाठी शाळांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवसांत शाळांना चार महिन्यांचा निधी एकत्रित वितरित केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय शाळा, अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबवण्यात येते. त्यात पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक, १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक, २० ग्रॅम प्रथिनेयुक्त भोजन देण्यात येते. त्यासाठी शासननियुक्त पुरवठादाराकडून शाळांना तांदूळ, कडधान्ये, तेल, तिखट, मीठ, मसाला, मोहरी, जिरे अशा धान्य मालाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात स्वयंपाक्यांकडून आहार शिजवून घेऊन विद्यार्थ्यांना दिला जातो, शहरात केंद्रीय स्वयंपाकघरातून आहार पुरविण्यात येतो.केंद्र आणि राज्य सरकारकडून पोषण आहार योजनेसाठीचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. पुढील चार दिवसांत चार महिन्यांचा एकत्रित निधी शाळांना वितरित केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु