कॅनबेरा, १६ ऑक्टोबर (हिं.स.): ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ पर्थमध्ये दाखल झाला आहे. भारतीय एकदिवसीय संघातील प्रमुख खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि नवा कर्णधार शुभमन गिल गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये दाखल झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
कोहली, रोहित आणि गिल व्यतिरिक्त, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे देखील संघासोबत पर्थमध्ये पोहोचले. विमान उड्डाणाच्या विलंबामुळे संघ पर्थमध्ये उशिरा पोहोचला. त्यांच्यासोबत काही सपोर्ट स्टाफ सदस्यही होते. तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कोचिंग स्टाफचे इतर सदस्य बुधवारी संध्याकाळी दिल्लीहून रवाना झाले होते.
या मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळवला जाईल. दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी ऍडलेड येथे आणि तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळतील.
या मालिकेभोवती विशेष उत्साह आहे कारण मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. शुभमन गिलची एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, दोन्ही क्रिकेटपटूंच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत.
रोहित आणि कोहलीने आधीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण दोघेही २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळण्यास इच्छुक आहेत.
कर्णधार शुभमन गिलही त्यांच्या समर्थनार्थ बोलला आहे. तो म्हणाला, या दोन्ही क्रिकेटपटूंना असलेला अनुभव आणि भारताच्या विजयात त्यांचे योगदान - इतके कौशल्य, गुणवत्ता आणि अनुभव फार कमी क्रिकेटपटूंकडे आहे. जगात असे क्रिकेटपटू खूप कमी आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या अलिकडच्या कसोटी मालिकेतील विजयादरम्यान, गिलने संकेत दिले की रोहित आणि कोहली २०२७ च्या विश्वचषकापर्यंत संघाचा भाग राहू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे