नाशकात प्रकाश लोंढेचे कार्यालय मनपाने केले जमीनदोस्त
नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांची नंदिनी नदी लगतच्या अनधिकृत दोन मजली इमारत अखेर आज जमीनदोस्त करण्यात आली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मनपाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ह
प्रकाश लोंढे कार्यालय कारवाई


नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांची नंदिनी नदी लगतच्या अनधिकृत दोन मजली इमारत अखेर आज जमीनदोस्त करण्यात आली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मनपाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे बांधकाम पाडण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता सुरुवात केली.

सातपूर येथील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले प्रकाश लोंढे व त्यांचे पुत्र दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांच्या काळ्या कारनाम्यांविरुद्ध पोलिसांनी दंड थोपटले असताना नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने देखील प्रकाश लोंढे यांच्यावर बारकाईने नजर ठेवीत विनापरवाना नदीपात्रालगत बांधलेल्या या बांधकामावर हातोडा मारला.

या अनधिकृत बांधकामा संदर्भात नाशिक महानगरपालिकेने प्रकाश लोंढे यांना रीतसर नोटीस पाठवून पंधरा तारखेपर्यंत मुदत दिली होती. मात्र त्याला कालपर्यंत कोणतेही उत्तर न आल्यामुळे अखेर काल दुपारी या वादग्रस्त इमारतीवरील लोखंडी व वेल्डिंगचे काम गॅस कटरने कट करून खाली उतरविले. हे काम मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होते.

त्यानंतर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्व यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली.

गत शुक्रवारी (दि.10) नाशिक महानगरपालिकेच्या पथकाने पाहणी करत हे काम अनधिकृतपणे नंदिनी नदीच्या निळ्या पुररेषेत बांधल्याचे निदर्शनात आणून दिले होते. त्यानंतर पाच दिवसांत याप्रकरणी प्रकाश लोंढे यांच्या वतीने कोणीही बांधकामासंदर्भात कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून कांबळेवाडी येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली.

सध्या प्रकाश लोंढे व दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर संशयित भूषण लोंढे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लोंढे यांनी सातपुर शिवारातील कांबळेवाडी येथील आयटीआय पुलाजवळील नंदिनी नदीच्या पात्रालगत बेकायदेशीरपणे दोन मजली सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले होते.

नाशिक महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत लोंढे यांनी सुमारे 25 मीटर बाय 10 मीटर मापाचे तळ मजला व पहिला मजला असे पक्के बांधकाम व त्यावर होर्डिर्ंग असे नंदीनी नदीच्या निळ्या पुर रेषेच्या आत अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले होते. बांधकाम विनापरवाना असल्यामुळे सार्वजनिक हितास व व्यक्तीगत हितास बाधा होण्याची शक्यता असून कायद्याचा अनादर करुन या बांधकामामुळे आर्थिक हानीबरोबरच जीवितहानी होऊ शकते, असे नोटीसीत म्हटले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम आज पाडले.

आज सकाळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त संगिता नांदुरकर हे घटनास्थळी उपस्थित होते. यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या कारवाईमध्ये 20 माजी सैनिक, 25 जणांचे मनपा अतिक्रमण पथक, 2 जेसीबी, 1 पोकलेन, 1 अग्निशमन दल वाहन असा फौज फाटा सहभागी झाले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व मनपा कर्मचारी देखरेख करीत आहेत. या ठिकाणची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande