सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेने २०० रुपयांनी दर कमी झाला आहे. झालेल्या लिलावात कांद्याला अवघा ९०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. सध्या बाजारात नवीन कांदा दाखल होत असून, त्याची कवडीमोल दराने त्याची विक्री होत आहे. अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचा दर्जा घसरल्याचा हा परिणाम आहे.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दीडशेहून अधिक ट्रक कांद्याची आवक झाली. चाळीत साठवलेल्या उच्च दर्जाच्या कांद्याला कमाल २३०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला पण हा दर अवघ्या २२ पिशव्यांना मिळाला. सरासरी दर मात्र एक हजार रुपयांपेक्षा कमी राहिला. जादाचा दर चाळीत साठवलेल्या जुन्या कांद्याला मिळाला. सध्या बाजारात नवीन कांदा दाखल होत आहे. अतिवृष्टीमुळे या कांद्याचा दर्जा घसरला आहे. यामुळे हा कांदा खरेदी करण्यास ग्राहक इच्छुक नाहीत.
सद्यःस्थितीला कांद्याची मातीमोल दराने विक्री होताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या ग्राहकधार्जिण्या धोरणामुळे कांदा उत्पादकाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. सद्यःस्थितीला राज्यात साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर येत आहे. या कांद्याच्या विक्रीचा दबाव बाजारात असल्यामुळेच गेली चार महिने अतिवृष्टी होऊनही कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही. अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरवात होते. या वर्षी मात्र उत्पादकाच्या पदरी निराशा आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड