नाशिक, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे सुरू असलेल्या, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय -च्या सी के नायडू ट्रॉफीत , दुसऱ्या दिवशी अतिशय वेगाने घडामोडी घडल्या आज दिवसभरात एकूण १७ बळींच्या मोबदल्यात २६६ धावा झाल्या. त्यामुळे सामन्यात अतिशय रंगत निर्माण झाली आहे. पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात ५ बाद ६० धावा झाल्या असून, सौराष्ट्र संघ एकूण १२९ धावांनी पुढे आहे व त्यांचे अजून ५ गडी बाद व्हायचे बाकी आहेत.
सौराष्ट्र संघास ६९ धावांची पहिल्या डावातील आघाडी नंतर दुसऱ्या डावात आय पी एल खेळाडू जलदगती राजवर्धन हंगर्गेकरने सुरुवातीसच त्याच्या पहिल्या व तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले - १ बाद ४ , २ बाद ७. अब्दुस सलामने ही त्याच्या तिसऱ्या षटकात कर्णधार रक्षित मेहतास बाद केले ५.३ षटकात ३ बाद २२. हंगर्गेकरने पुन्हा आपल्या चौथ्या षटकात त्याचा तिसरा बळी घेतला-एकूण ६.५ षटकात ४ बाद २४. त्यानंतर सौराष्ट्रच्या फलंदाजांनी पुढची १२ षटके सावध खेळून काढली, पण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर नीरज जोशीने पायचीतचा बळी मिळवला. त्यामुळे दिवसअखेर सौराष्ट्र दुसऱ्या डावात - १९ षटकांत ५ बाद ६०. आघाडी एकूण १२९ धावांची.
त्याआधी सकाळी पहिल्या सत्रात सौराष्ट्रच्या २५२ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राच्या सलामीवीर नीरज जोशीने आक्रमक सुरुवात केली, पण तो ३४ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला- ११.५ षटकांत १ बाद ५५. त्यानंतर अनिरुद्ध साबळे १७ धावांवर बाद झाल्यामुळे महाराष्ट्र उपहारास २ बाद ६३. उपहारानंतर दुसऱ्या सत्रात सुरुवातीसच उपकर्णधार दिग्विजय पाटील ८ व किरण चोरमळे ६ बाद झाले - ४ बाद ८४. इथून कर्णधार सचिन धसने आक्रमक साहिल औताडे-२३ धावा-सह ५६ धावांची भागीदारी केली ५ बाद १३८. चहापानास ५ बाद १६४. तिसऱ्या सत्रात चहापानानंतर यष्टीरक्षक अनुराग कवडे ८ व अजय बोरुडे २ पाठोपाठ कर्णधार सचिन धस अर्धशतक पूर्ण करून वर ५१ धावांवर लगेच - ८ बाद १७२- बाद झाल्याने राजवर्धन हंगर्गेकर व शुभम मैडला झटपट बाद करत सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी, महाराष्ट्राला ४९.१ षटकांत सर्वबाद १८३ असे रोखले आणि सौराष्ट्रने ६९ धावांची आघाडी मिळवली. सौराष्ट्रचे दोन डावखुरे फिरकीपटू त्यात मौर्य घोगरीने अष्टपैलु कामगिरी करत ४ व क्रेन्स फुलेत्रानेही ४ बळी घेतले. हितेन कानबी व चंद्रराज राठोडने प्रत्येकी १ बळी घेतला.
त्याआधी सकाळी ८ बाद २२९ वरुण पुढे खेळताना, मौर्य घोगरीने तळाच्या दोघांना साथीला घेऊन पहिल्या तासात कालच्या धावसंख्येत २३ धावांची भर घातली. राजवर्धन हंगर्गेकरने मौर्य घोगरीला ६१ धावांवर त्रिफळाचीत करून सौराष्ट्रचा पहिला डाव २५२ धावांवर संपवला. जलदगती राजवर्धन हंगर्गेकरने शेवटचे दोन्ही गडी त्रिफळाचीत करत २९.१ षटकांत ६३ धावा देत ४ बळी टिपले. तर डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम मैडनेही ३४ षटकांत ७२ धावांत ४ बळी घेतले.
तिसऱ्या दिवशी सौराष्ट्रचे शेवटचे ५ फलंदाज - त्यात पहिल्या डावातील ९२ ची भागीदारी करणारे मौर्य घोगरी व तीर्थराज सिंग जडेजा खेळायचे बाकी असून - महाराष्ट्रासमोर विजयासाठी किती धावांचे आव्हान देणार ते बघूया.
संक्षिप्त धावफलक - सौराष्ट्र पहिला डाव २५२ - मौर्य घोगरी ६१, शुभम मैड व राजवर्धन हंगर्गेकर प्रत्येकी ४ बळी व दूसरा डाव ५ बाद ६० - राजवर्धन हंगर्गेकर ३ बळी , चुडासामा नाबाद ३३.
विरुद्ध
महाराष्ट्र पहिला डाव १८३ - सचिन धस ५१, मौर्य घोगरी व क्रेन्स फुलेत्रा प्रत्येकी ४ बळी.
-----------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV