मॉस्को, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियन तेल खरेदीबाबत दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रशियाचे उप-पंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले की, “मला विश्वास आहे की आमचे भागीदार आमच्यासोबत काम करत राहतील. आमच्या उर्जा स्रोतांची मागणी आहे, ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि व्यवहार्य आहेत. आमचे भागीदार भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की कोणीही त्यांना आदेश देऊ शकत नाही आणि ते स्वतःचा मार्ग स्वतः निवडतील. हेच आमच्या नात्याची खरी कसोटी आहे.”
नोवाक यांनी हेही सांगितले की, भारताने आता काही प्रमाणात तेलाची पेमेंट चीनी चलन ‘युआन’मध्ये करायला सुरुवात केली आहे, तरीसुद्धा बहुतांश व्यवहार अजूनही रशियन ‘रूबल’मध्येच होत आहेत. सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून सुमारे 25,597 कोटी रुपयांचे तेल खरेदी केले आहे, जे चीनच्या तुलनेत कमी आहे.
दरम्यान, भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितले की, भारत आणि रशियामधील उर्जा संबंध हे पूर्णतः नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय हितांनुसार आहेत. दोन्ही देशांमधील एकूण द्विपक्षीय व्यापार संबंध अधिकाधिक सुदृढ होत आहेत.
जेव्हा अलीपोव यांना विचारण्यात आले की ट्रम्प यांच्या टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवर भारत रशियन कच्च्या तेलाची खरेदी चालू ठेवेल का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “याचे उत्तर भारत सरकारच देऊ शकते. भारत सरकार आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितांचा विचार करून या विषयावर निर्णय घेत आहे.” अलीपोव यांनी हेही नमूद केले की, भारताच्या एकूण हायड्रोकार्बन आयातीत रशियन कच्च्या तेलाचे योगदान सुमारे एक-तृतीयांश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode