* जेरीचा राजीनामा देण्यास नकार
लिमा, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।पेरूचे देशात नवे राष्ट्रपती जोस जेरी यांच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आणि सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. हे आंदोलन मुख्यतः जेन-झी तरुणाईच्या नेतृत्वाखाली झाले असून त्यांनी राष्ट्रपतींना पद सोडण्याची मागणी केली आहे.दरम्यान, गुरुवारीच राष्ट्रपती जोस जेरी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्यांमध्ये 24 आंदोलनकर्ते 80 पोलीस कर्मचारी आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. ज्यामध्ये सहा जणांना पैलेट्स लागले, तर चार जणांवर पोलिसांनी थेट हल्ला केला. या आंदोलनादरम्यान 32 वर्षीय हिप-हॉप गायक एडुआर्डो रुइज याचा गोळी लागून मृत्यू झाला. अभियोजकांनी सांगितले की, त्याच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रुइज ला लीमा शहरातील रस्त्यावर कोसळताना दिसते. सुरक्षा यंत्रणा या गोळीबाराची चौकशी करत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती जेरी यांनी संसदभेटीनंतर स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले, “देशातील स्थिरता टिकवून ठेवणे ही माझी जबाबदारी आणि कटिबद्धता आहे.”
सुमारे एका महिन्यापूर्वी सुरू झालेले हे आंदोलन सुरुवातीला चांगल्या निवृत्तीवेतन आणि तरुणांसाठी नोकरीच्या संधी यांसाठी होते. हळूहळू हे आंदोलन भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि सरकारच्या अपयशांविरोधातील मोठ्या जनआंदोलनात रूपांतरित झाले. जेरी हे गेल्या 10 वर्षांत पेरूचे सातवे राष्ट्रपती आहेत आणि त्यांनी 10 ऑक्टोबर रोजी शपथ घेतली होती. त्यांचं पदभार स्वीकारल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झालं आणि तरुणांनी फक्त राष्ट्रपतींचाच नव्हे, तर सांसदांचाही राजीनामा मागायला सुरुवात केली.
पेरूचे नवे जेरी सरकार सध्या विविध वादांत अडकलेले आहे. सध्याचे राष्ट्रपती जोस जेरी याआधी पेरू काँग्रेसचे अध्यक्ष होते. एका महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत, ज्याच्या चौकशीसाठी ते तपासाच्या कक्षेत आले होते. मात्र, त्यांनी हे आरोप ऑगस्टमध्ये फेटाळले होते.या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर तीव्र टीका केली आहे. या Gen Z आंदोलनादरम्यान महिलांनी त्यांना “बलात्कारी” अशा शब्दांत संबोधले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि सौम्य बलप्रयोग करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
पेरूचे नागरिक म्हणतात की, ते अनेक दशकांपासून भ्रष्टाचार आणि अपयशी सरकारांमुळे त्रस्त आहेत. युवा वर्गामध्ये निराशा वाढत आहे आणि ते आता बदलाची मागणी करत आहेत. सरकारच्या धोरणांमुळे आणि वाढत्या हिंसाचारामुळे सामान्य जनतेचा संताप वाढत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode