नवी दिल्ली , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी त्याच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा ऑस्ट्रेलिया दौरा हा आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटचा दौरा ठरू शकतो, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता विराट कोहलीने स्वतःच या चर्चांवर मोठं उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी कोहलीने ‘एक्स’ वर एक पोस्ट केली. त्याने लिहिलं,“आपण खरंतर तेव्हाच अपयशी ठरतो, जेव्हा आपण स्वतः पराभूत होण्याचा निर्णय घेतो.” ही पोस्ट त्याच्या वनडे करिअरच्या भविष्याशी जोडली जात आहे. विराटने आधीच टेस्ट आणि टी-20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, आणि आता तो फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञ विचार करत होते की तो 2027 च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत संघात राहील का?
या चर्चांदरम्यान, बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजीत अगरकर यांनीही परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं,
“विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना 2027 वर्ल्डकप लक्षात घेऊन संघात ठेवण्यात आलं आहे. दोघांनीही आपले फिटनेस चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत आणि ते पूर्णपणे फिट आहेत. त्यामुळे सध्या निवृत्तीबद्दल बोलणं ही फारच घाई होईल.” तसंच अगरकर यांनी असंही सांगितलं की, “विराट आणि रोहित हे टीम इंडियासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि त्यांचा अनुभव भविष्यातील मोठ्या मालिकांसाठी उपयुक्त ठरेल.”
दुसरीकडे, वेस्ट इंडीजविरुद्ध टेस्ट मालिकेत भारताच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खेळाडूंच्या भविष्याकडे लक्ष देण्याऐवजी सध्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. 50 ओव्हर्सचा वर्ल्डकप अजून दीड-दोन वर्षे दूर आहे. विराट आणि रोहित हे अनुभवी खेळाडू आहेत आणि ऑस्ट्रेलियात त्यांचा अनुभव संघासाठी खूप उपयुक्त ठरेल.”
विराट कोहलीसाठी हा दौरा फक्त वैयक्तिक पातळीवर नव्हे तर भारतीय संघासाठीही खूप महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सामने नेहमीच रोमांचक आणि स्पर्धात्मक राहिले आहेत, आणि यावेळी भारताचा उद्देश आहे ही सीरिज जिंकून 2027 वर्ल्डकपच्या तयारीला बळकटी देणं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode