ठाणे, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्हा क्रीडा परिषद ठाणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या वतीने आयोजित मुंबई विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा आज कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला एकूण २६१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे आयोजन वेटलिफ्टिंग असोसिएशन ठाणे आणि अश्वमेध वेटलिफ्टिंग फाऊंडेशन ठाणे यांच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन माजी सचिव, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशन श्री. प्रमोद चोळकर आणि वेटलिफ्टिंग असोसिएशन ठाणेचे अध्यक्ष श्री. अनिल माहूली यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुवर्णा बारटक्के आणि तालुका क्रीडा अधिकारी सौ. सायली जाधव यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी लक्ष्मी ठाणेकर, आणि सुचिता तेंडुलकर यांनीही उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी २० अधिकृत पंच आणि तांत्रिक अधिकारी कार्यरत होते. अश्वमेध वेटलिफ्टिंग फाऊंडेशन ठाणेच्या सर्व खेळाडूंनी आणि पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिले.
या स्पर्धेतून ठाणे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या दमदार कामगिरीची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर