नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - जगभरात आज जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन 2025 साजरा होत असताना, आयुष मंत्रालयाने जागतिक स्तरावर लाखो लोकांना प्रभावित करणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस या मूक परंतु मोठ्या सार्वजनिक आरोग्य आव्हानाला तोंड देण्यासाठी सुरुवातीपासूनच घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी आणि जीवनशैलीतील हस्तक्षेपाच्या गंभीर गरजेवर भर दिला आहे. या वर्षीच्या उपक्रमाचा उद्देश हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या परिस्थितीसाठी आयुर्वेद कसे शाश्वत, प्रतिबंधात्मक आणि पुनर्स्थापनेचे उपाय करू शकतो, याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
तज्ज्ञांच्या मते, ऑस्टिओपोरोसिस ही एक हाडे कमकुवत करणारी स्थिती आहे, त्यामुळे हाडे ठिसूळ बनतात आणि ती तुटण्याची शक्यता वाढते. हाडांची ताकद आणि घनता कमी झाल्यामुळे हा आजार हळूहळू विकसित होतो आणि त्याला अनेकदा मूक आजार (silent disease) म्हटले जाते, कारण फ्रॅक्चर होईपर्यंत सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये, पहिले लक्षण म्हणजे अनेकदा नितंब, मनगट किंवा पाठीच्या कण्यामध्ये झालेले हाडांचे फ्रॅक्चर - ज्यामुळे वेदना, शरीराच्या स्थितीत बदल उदा. कुबड येणे , आणि जखम बरी व्हायला विलंब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आयुर्वेदानुसार, ऑस्टिओपोरोसिस प्रामुख्याने वात दोषाच्या विकृतीशी संबंधित आहे, त्यामुळे हाडांची ताकद आणि हाडांची घनता कमी होते. ही शास्त्रीय समज आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाशी लक्षणीय साम्य दर्शवते. त्यात हाडांमधील खनिजांची कमतरता आणि वयानुसार होणारे आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हार्मोनल बदल ऑस्टिओपोरोसिसला कारणीभूत ठरतात असे म्हटले आहे.
केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य यांनी नमूद केले की, ऑस्टिओपोरोसिस हे सार्वजनिक आरोग्यासमोर वाढते आव्हान आहे, मात्र, आयुर्वेदाच्या प्रतिबंधात्मक आणि पुनर्संचयित ज्ञानाद्वारे त्याचा प्रभावी मुकाबला करणे शक्य आहे. अस्थि सौषिर्य ही शास्त्रीय संकल्पना हाडांच्या ठिसूळपणाच्या आधुनिक समजुतीशी मिळतीजुळती आहे. आयुर्वेदाचा लवकर हस्तक्षेप, संतुलित आहार आणि अनुकूल जीवनशैलीवर असलेला भर हा मजबूत हाडे आणि निरोगी वृद्धत्वासाठी एक नैसर्गिक मार्ग दाखवतो.
केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेने ऑस्टिओपोरोसिसच्या व्यवस्थापनात लक्ष गुग्गुळ आणि प्रवाळ पिष्टी यांसारख्या आयुर्वेदिक औषधांची वैधता तपासण्यासाठी आणि स्नायूअस्थिजन्य विकारांमध्ये आयुर्वेदिक हस्तक्षेपाच्या भूमिकेवर ठोस पुरावे निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास सुरू केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ऑस्टियोपोरोसिसच्या व्यवस्थापनात आयुर्वेदाचा प्रतिबंधात्मक आणि समग्र दृष्टिकोन हाडे मजबूत करण्यासाठी, संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आणि झीज रोखण्यासाठी आयुर्वेद एक व्यापक व्यवस्थापन दृष्टिकोन प्रदान करतो. सीसीआरएएस ने खालील प्रमुख उपाययोजना अधोरेखित केल्या आहेत:
● रसायन चिकित्सा (कायाकल्प): रसायन सूत्रांचा लवकर अवलंब केल्याने अस्थिसंस्था मजबूत होते आणि वयानुसार होणारी झीज लांबणीवर टकता येते.
● स्नेहन (उपचारात्मक मालिश): महानारायण तेल, दशमूल तेल, चंदना बला लक्षादी तेल यासारख्या औषधी तेलांचा वापर गहन ऊतींना पोषण देऊन हाडे आणि सांधे यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
● औषधी सूत्रीकरण: लक्ष गुग्गुळु, महायोगराज गुग्गुळ, प्रवाळ पिष्टी आणि मुक्ता शुक्ति भस्म यासारख्या शास्त्रीय पारंपरिक आयुर्वेदीय औषधी संयोजनांचा वापर हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि बरे होण्यास मदत करण्यासाठी केला जातो.
● वात-शामक आहार आणि जीवनशैली: डाळिंब, आंबा आणि द्राक्षे यांसारख्या फळांसह कुलथी (चणा), शुंठी (आले), रसोणा (लसूण), मुंगा (हिरवे मूग) आणि कुष्मांड (राखडा) यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने हाडांची घनता टिकून राहण्यास मदत होते आणि शरीराला स्फुर्ती मिळते.
● योग आणि सौम्य व्यायाम: विशिष्ट आसने शरीराची लवचिकता वाढवतात, हाडे आणि सांध्यातील रक्ताभिसरण सुधारतात आणि कडकपणा टाळतात.
या जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन 2025, निमित्त आयुष मंत्रालयाने नागरिकांना - विशेषतः वृद्ध व्यक्तींना आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना - आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित आहार आणि सौम्य शारीरिक हालचालींचा अवलंब करण्याचे आवाहन करते. या सर्वांगीण पद्धतींचा दैनंदिन जीवनात समावेश करून, व्यक्ती आपली हाडे मजबूत करू शकतात, अस्थिभंगाचा धोका कमी करू शकतात तसेच निरोगी, अधिक सक्रिय वृद्धत्वाचा मार्ग सुनिश्चित करू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी