नागपूर, 02 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जातिवाद नाही, येथे सर्वजण समान असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. नागपुरात आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते आज, गुरुवारी बोलत होते.
याप्रसंगी कोविंद यांनी डॉ. आंबेडकर यांच्यासह संत तुकाराम, संत रविदास, बिरसा मुंडा, नारायण गुरु आदी विभूतिंचा उल्लेख करत संघाच्या समाजसमरसतेच्या भूमिकेचे कौतुक केले. संघ सामाजिक एकतेचा आणि समतेचा खऱ्या अर्थाने प्रचारक आहे. माझ्या जीवनात डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांचा फार मोठा वाटा आहे.संविधानामुळे एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीस राष्ट्रपतीपदासारखी सर्वोच्च जबाबदारी निभावता आली. हे आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनाचे फलित आहे. संघामध्ये जातीची विचारधारा चालत नाही. येथे सर्वजण एकसमान आहेत. समाजात संघाविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत, ते दूर होणे आवश्यक असल्याचे कोविंद यांनी सांगितले.
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2001 मध्ये झालेल्या ‘दलित संगम रॅली’ चा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “त्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, ‘आमची सरकार मनुस्मृती नव्हे तर भीमस्मृती – म्हणजे संविधान – यावर आधारित आहे.
संघावरील दलितविरोधी आरोपांवर भाष्य करताना कोविंद म्हणाले की, “हे आरोप निराधार आहेत. संघाच्या विचारधारेत सर्वसमावेशकता आणि समतेचा केंद्रबिंदू आहे. आजही अनेक लोकांना हे माहित नाही की संघामध्ये जातपात, उंच-नीच यासारख्या संकल्पना अस्तित्वातच नाहीत.
सामाजिक सुधारणा व राष्ट्रीय एकता या विषयावर भर देत त्यांनी सांगितले, “बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार या दोघांनीही एकतेचा संदेश दिला. बाबासाहेबांनी संविधान सभेत दिलेल्या भाषणात जी चिंता व्यक्त केली होती, ती संघाच्या विचारांशी सुसंगत आहे.
कार्यक्रमाची सांगता करताना कोविंद म्हणाले, “सर्वप्रथम आपण भारतीय आहोत. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सामाजिक बंधुत्व हीच खरी ओळख आहे. समाजातील सर्व वर्गांनी एकत्र येणे आणि भेदभावविरहित समाज निर्मिती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी