नवी दिल्ली, २० ऑक्टोबर (हिं.स.) दिल्लीतील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावली आहे. दिवाळीच्या सकाळी हवेची गुणवत्ता अधिक विषारी होती आणि दुपारपर्यंत हवेची गुणवत्ता आणखी खालावली. ३८ पैकी ३१ निरीक्षण केंद्रांवर प्रदूषण पातळी खूपच खराब आणि तीन निरीक्षण केंद्रांवर गंभीर अशी नोंदवण्यात आली. यासह दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३०० च्या पुढे गेला, जो खूपच खराब श्रेणीत येतो.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) समीर ऍपवरील आकडेवारीनुसार, नवी दिल्लीतील एकूण AQI दुपारी ३३४ वर नोंदवण्यात आला. जो सकाळी ९ वाजता ३३९ होता. ३१ निरीक्षण केंद्रांनी हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रेणीत नोंदवली, ज्यामध्ये AQI पातळी ३०० च्या वर होती. तर आनंद विहार (४०२), वजीरपूर (४२३) आणि अशोक विहार (४१४) या तीन केंद्रांवर प्रदूषण 'गंभीर' श्रेणीत नोंदवण्यात आले.
मंगळवार (२१ ऑक्टोबर) आणि बुधवारी (२२ ऑक्टोबर) हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत आणखी खालावण्याची शक्यता आहे. शून्य ते ५० दरम्यानचा AQI 'चांगला', ५१ आणि १०० 'समाधानकारक', १०१ आणि २०० 'मध्यम', २०१ आणि ३०० 'खराब', ३०१ आणि ४०० 'अत्यंत खराब' आणि ४०१ आणि ५०० 'गंभीर' मानला जातो. दरम्यान, यापूर्वी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा (GRAP) दुसरा टप्पा लागू केला होता.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे